'BCCI सचिव जय शाह यांनी...', IPL विरुद्ध Test वादावर द्रविडचा उल्लेख करत गांगुलीचं मोठं विधान, 'मला तरी यात...'

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या आयपीएल विरुद्ध कसोटी असा वाद सुरु आहे. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने मोठं विधान केलं आहे. त्याने सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा उल्लेख केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Mar 3, 2024, 02:32 PM IST
'BCCI सचिव जय शाह यांनी...', IPL विरुद्ध Test वादावर द्रविडचा उल्लेख करत गांगुलीचं मोठं विधान, 'मला तरी यात...' title=

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या आयपीएल विरुद्ध कसोटी असा वाद सुरु आहे. यादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने प्रथम श्रेणी क्रिकेट खेळत तुम्ही आपलं आयपीएल करिअर सुरु ठेवू शकता असं म्हटलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सहभागी होत नसल्याने बीसीसीआयने ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर कारवाई करत वार्षिक करारातून हकालपट्टी केली आहे. यासंबंधी बोलताना सौरव गांगुलीने विराट कोहली, रोहित शर्मा, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर यासारख्या अनेक खेळाडूंनी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील करिअरमध्ये समतोल राखला असल्याचं सांगितलं. यावेळी त्याने आपण कशाप्रकारे राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरसह दोन्ही प्रकारात खेळत होतो याबद्दलही सांगितलं. 

"ते कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात खेळू शकतात. प्रथम श्रेणी क्रिकेटसह तुम्ही आयपीएल करिअरही सांभाळू शकता. ते दोन्ही एकमेकांसाठी अडचणीचे ठरत नाहीत. प्रथम श्रेणी क्रिकेट संपल्यानंतर जवळपास एक महिन्याने आयपीएलची सुरुवात होते. मला यात काही समस्या दिसत नाही," असं सौरव गांगुली म्हणाला आहे.

"अनेक टॉपचे खेळाडू कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळतात. तुम्ही विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत यांच्याकडे पाहू शकता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाहायला गेल्यास मिचेल मार्शचं उदाहरण आहे. तो आता ऑस्ट्रेलियाचा प्रीमिअर रेड बॉल खेळाडू आहे. हॅरी ब्रूकही कसोटी खेळतो. डेव्हिड वॉर्नर इतकी कसोटी खेळतो, पण एकदिवसीयमध्येही तो सर्वोत्तममध्ये आहे. आमच्या काळातही सचिन, राहुल आणि मी कसोटी खेळायचो आणि नंतर एकदिवसीय खेळायचो. आम्ही एक खेळू शकतो आणि दुसरं नाही असं सांगण्याचं काही कारण नाही," असं मत सौरव गांगुलीने मांडलं आहे.

नव्या खेळाडूंना मार्गदर्शनाची गरज आहे का? असं विचारण्यात आलं असता सौरव गांगुली म्हणाला की, "ईशान किशनसारख्या खेळाडूशी बीसीसीआय सचिव जय शाह, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि निवडकर्त्यांनी चर्चा केली पाहिजे. त्याने रणजी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळलं आहे. याने तो खऱाब खेळाडू झाला आहे का? नक्कीच नाही".

"दिल्ली कॅपिटल्स संघात निवड झालेले सर्व खेळाडू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी खेळली आहे. ईशांत शर्माही रणजी खेळला आहे. खलील अहमद फार काळाने सगळा सीझन खेळला आहे. आम्ही त्याच्यासह काम केलं आणि रणजी खेळण्यासाठी फिट केलं. फक्त एक ते दोन अपवाद आहेत ज्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे," असं सौरव गांगुलीने सांगितलं आहे.