'या' टीमकडून पराभूत झाल्यास भारत T20 विश्वचषकातून बाहेर? एका पराभवाने अनेक संकटे

 T20 World Cup 2021 :  भारताला (Team India) पाकिस्तानकडून (Pakistan) मोठा पराभव स्वीकारावा लागला.  या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Updated: Oct 26, 2021, 09:33 AM IST
'या' टीमकडून पराभूत झाल्यास भारत T20 विश्वचषकातून बाहेर? एका पराभवाने अनेक संकटे  title=

दुबई : T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात भारताला (Team India) पाकिस्तानकडून (Pakistan) मोठा पराभव स्वीकारावा लागला. विराट कोहली याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 10 गडी राखून पाकिस्तानने पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताचा पुढील सामना 31 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचा पराभव झाला, तर ते विश्वचषकामधून बाहेर फेकले जाऊ शकतात.

भारताला काही करुन जिंकणे महत्वाचे

विश्वचषकस्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. पाकिस्तानपाठोपाठ भारतालाही न्यूझीलंडविरुद्ध हार पत्करावी लागली तर टी-20 विश्वचषकातून आव्हानच संपुष्टात येईल. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव झाल्यास, T20 विश्वचषक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारताला त्यांचे पुढील तीन सामने अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध जिंकावे लागतील, तसेच इतर संघांच्या विजय आणि पराभवाच्या निकालांवर अवलंबून राहावे लागेल. 

पाकिस्तान, न्यूझीलंडला 2-2 सामने गमवावे लागतील

T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला टॉप 2 मध्ये राहावे लागेल. समजा पाकिस्ताननंतर भारतालाही न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला, तर त्याच्याप्रमाणे पाकिस्तान किंवा न्यूझीलंड यापैकी एक मोठा संघ किमान दोन सामने हरला पाहिजे. असे असूनही, भारताला त्यांचे पुढील उर्वरित तीन सामने चांगल्या धावगतीने जिंकावे लागतील. अशा स्थितीत दोन सामने गमावूनही भारताला जीवदान मिळू शकते. भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मोठा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणे आवश्यक आहे. तसेच अफगाणिस्तानच्याबाबतीत आहे.

लहान संघांसह सावधगिरी बाळगा

अफगाणिस्तानचा संघ उपांत्य फेरीपर्यंत धडक मारु शकणार नाही. मात्र भारत, पाकिस्तान किंवा न्यूझीलंडसारख्या मोठ्या संघाची डोकेदुखी वाढवू शकतो. अशा स्थितीत भारतीय संघाला सदैव सतर्क राहावे लागणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यास भारताला छोट्या संघांसह, विशेषत: अफगाणिस्तानच्याबाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. अफगाणिस्तान मोठ्या संघांना पराभूत करू शकतो. 2019 च्या विश्वचषकातही भारत अफगाणिस्तानकडून पराभूत होण्यापासून वाचला होता.

मुजीब आणि रशीद यांचा टीम इंडियाला इशारा

सोमवारी अफगाणिस्तानने स्कॉटलंडचा 130 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. टीम इंडिया 3 नोव्हेंबरला अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर अफगाणिस्तानविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे. विराट कोहली याचा संघ पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर प्रत्येक सामना जिंकण्याचा प्रयत्न केरेल. जेणेकरून उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा करता येईल. स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात मुजीब उर रहमानने 4 षटकात 5 च्या इकॉनॉमी रेटने अफगाणिस्तानसाठी 20 धावा दिल्या आणि 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचवेळी स्टार फिरकीपटू राशिद खानने 2.2 षटकांत 3.85 च्या इकॉनॉमी रेटने 4 विकेट घेतल्या.