T20 World Cup 2024: भारतीय संघाला 2007 नंतर टी-20 विश्वचषक स्पर्धा जिंकता आलेली नाही. 3 ऑगस्टपासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ आयर्लंडच्या दौऱ्यामध्ये 3 टी-20 सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांमध्ये तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही मालिकांकडे म्हणजे पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपची पूर्व तयारी म्हणून पाहिलं जात आहे.
भारतीय संघाला मागील अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या माध्यमातून आयोजित केल्या जाणारी एकही स्पर्धा जिंकता आलेली नाही. भारताने आयसीसीची शेवटची ट्रॉफी 2011 साली जिंकली. भारताने यावर्षी 2011 साली एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक जिंकला. त्यापूर्वी भारताने 2007 मध्ये भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. आता यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये भारतात 5 ऑक्टोबरपासून एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धा खेळवली जाणार आहे. अगदी कर्णधार रोहित शर्मापासून विराट कोहलीपर्यंत अनेक वरिष्ठ खेळाडूंची ही अंतिम वर्ल्डकप स्पर्धा असेल असं मानलं जात आहे.
टी-20 वर्ल्डकप पुढील वर्षी म्हणजेच 2024 मध्ये जून महिन्यात होणार आहे. विराट कोहलीपासून रोहित शर्मापर्यंतचे वरिष्ठ खेळाडू मागील बऱ्याच काळापासून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. अशावेळेस आता भारतीय संघ व्यवस्थापनाने या दोघांसाठी कोणता पर्याय असू शकतो याची चाचपणी सुरु केली आहे. रोहित शर्माच्या जागी सलामीवीर म्हणून ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयसवाल, शुभमन गिलसारखे पर्याय निवडकर्त्यांसमोर आहेत. दुसरीकडे भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळही संपतोय. समोर आलेल्या बातम्यांनुसार काही कौटुंबिक कारणांमुळे द्रविड पुन्हा नव्याने ही जबाबदारी स्वीकारणार नाही असं सांगितलं जात आहे.
आयर्लंडविरोधात टी-20 मालिकेमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगपासून प्रसिद्ध कृष्णापर्यंत अनेकांना संघात स्थान देण्यात आलं आहे. अर्शदीप सिंग हा टी-20 वर्ल्डकपनंतर संघातून बाहेरच आहे. तर दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा जायबंदी असल्याने मैदानापासून दूर होता. आता प्रसिद्ध कृष्णा पुन्हा मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. टी-20 संघाचं नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं जवळजवळ निश्चित आहे. आयपीएल 2022 मध्ये पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सच्या संघाने आपल्या पहिल्याच पर्वात जेतेपदावर नाव कोरलं होतं. आयपीएल 2023 मध्ये पुन्हा गुजरातचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गुजरातच्या संघाला पराभूत करत पाचव्यांदा चषक जिंकला.
भारतीय संघातील मधल्या फळीमध्ये विराट कोहलीला पर्याय म्हणून अनेक तरुण खेळाडूंचा विचार केला जात आहे. यामध्ये आयर्लंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला शिवम दुबे, तिलक वर्मा यांचाही समावेश आहे. शेवटच्या षटकामध्ये तुफान फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रिंकू सिंहही संघात आहे. तसेच जितेश शर्माचंही आयर्लंडचं तिकीट निश्चित झालं आहे.
26 वर्षीय ऋतुराज गायकवाड आयर्लंड दौऱ्यामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार असेल. ऋतुराजची टी-20 मधील कामगिरी पाहिल्यास त्याने 106 सामन्यांमद्ये 103 डावांमध्ये 36 च्या सरासरीने 3426 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
21 वर्षीय यशस्वी जयसवालही सलामीवीर म्हणून प्रमुख दावेदार मानला जात आहे. त्याने आतापर्यंत 55 टी-20 सामन्यांमध्ये 30 च्या सरसारीने 1578 धावा केल्या आहेत. ज्यात एक शतक आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. स्ट्राइक रेट 144 इतका आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावलं होतं.
रिंकू सिंह आणि तिलक वर्मा यांची टी-20 मधील कामगिरीही दमदार आहे. 25 वर्षीय रिंकूने टी-20 च्या 81 डावांमध्ये फलंदाजी केली असून त्यात 10 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने टी-20 मध्ये 1768 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 141 इतका आहे. तर 20 वर्षीय तिलक वर्माने टी-20 मध्ये 46 डावांत 14 अर्धशतकांच्या मदतीने 143 च्या स्ट्राइक रेटने 1418 धावा केल्यात.