टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर भारतीय संघ गुरुवारी मुंबईत दाखल झाला होता. नरीमन पॉईंट ते वानखेडे मैदानापर्यंत काढण्यात आलेल्या रॅलीला पाहण्यासाठी अक्षरक्ष: जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्हवर (Marine Drive) लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी उभे होते. तसंच वानखेडे मैदानात मोफत प्रवेश असल्याने तुडुंब भरलं होतं. मुंबईतील हा दिवस क्रिकेटच्या इतिहासात कायमचा नोंदवला गेला आहे. मुंबईत दाखल झाल्यानंतर भारतीय क्रिकेटपटून ओपन बसमधून वानखेडे मैदानापर्यंत जात असताना रस्त्याच्या दुतर्फा क्रिकेटचाहत्यांनी गर्दी केली होती. वानखेडे मैदानात पोहोचल्यानंतर भारतीय संघाचा सत्कार करण्यात आला.
या सर्व सेलिब्रेशनमध्ये रोहित शर्माची सर्वात जास्त चर्चा होती. 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा दिल्या जात होत्या. दरम्यान मुंबईकर इतक्या मोठ्या संख्येने जमलेले पाहून सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले होते. यावेळी रोहित शर्मालाही एक आश्चर्याचा धक्का मिळाले. कारण त्याच्या स्वागतासाठी त्याचे बालपणीचे मित्र पोहोचले होते. यामध्ये तिलक वर्माही होता. बालपणीच्या मित्रांनी रोहितच्या केलेल्या स्वागताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, रोहित शर्मा हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याचे मित्र रांगेत उभे होते. सर्वात आधी त्यांनी रोहित शर्माला सॅल्यूट केला. त्यांना पाहून रोहित शर्माही आश्चर्यचकित झाला होता. यानंतर त्यांनी रोहित शर्माने वर्ल्डकप ट्रॉफी स्विकारताना केलेला वॉक करत त्याला खांद्यावर उचलून घेत एकच जल्लोष केला.
Part ft Childhood Friends #TeamRo #RohitSharma @ImRo45 pic.twitter.com/sSXJb68XRr
— Team45Ro (@T45Ro) July 4, 2024
भारतीय संघ, सपोर्ट स्टाफ आणि त्यांचे कुटुंबीय, मीडिया कर्मचारी वादळाचा फटका बसल्याने बार्बाडोसमध्ये अडकले होते. यामुळेच वर्ल्डकप जिंकल्यानंतरही भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्येच होता. ब्रिजटाऊनमधील ग्रँटली ॲडम्स आंतरराष्ट्रीय विमानतळ तीन दिवसांसाठी बंद होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी यानंतर भारतीय संघासाठी विमानाची व्यवस्था केली होती. 2 जुलैला विमानाने उड्डाण केलं आणि गुरुवारी सकाळी 6 वाजता दिल्लीला पोहोचलं. बोर्डाचे अधिकारी आणि मीडिया टीमचे सदस्यही विमानात होते.
भारतीय संघ विमानतळावर दाखल होताच चाहत्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. दरम्यान मुंबईत येण्यापूर्वी भारतीय संघाने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदींनी भारतीय संघासह औपचारिक गप्पा मारल्या. यावेळी फोटोसेशनही करण्यात आलं. यानंतर भारतीय संघ क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत ओपन परेडसाठी दाखल झाला होता. यानंतर जे काही घडलं त्याची नोंद आता क्रिकेटच्या इतिहासात कायमची झाली आहे.