आयसीसीचा ४ दिवसांच्या टेस्टचा विचार, विराटचा विरोध

टेस्ट मॅच रोमांचक आणि लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीकडून ५ दिवसांच्याऐवजी ४ दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

Updated: Jan 6, 2020, 12:27 PM IST
आयसीसीचा ४ दिवसांच्या टेस्टचा विचार, विराटचा विरोध title=

मुंबई : टेस्ट मॅच रोमांचक आणि लोकप्रिय करण्यासाठी आयसीसीकडून ५ दिवसांच्याऐवजी ४ दिवसांचा सामना करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आयसीसीची ही कल्पना भारताचा कर्णधार विराट कोहलीला मात्र आवडलेली नाही. असं केल्यामुळे एक दिवस टेस्ट क्रिकेटचा मृत्यू होईल, अशी भीती विराटने व्यक्त केली आहे. विराटने ही प्रतिक्रिया दिली असली तरी बीसीसीआयने मात्र याबाबतची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

विराटबरोबरच पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तरनेही आयसीसीवर टीका केली आहे. आयसीसीचा हा विचार बकवास आहे. यामध्ये कोणीच रस घेणार नाही. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली बुद्धीमान आहे आणि तो असं करुन देणार नाही. गांगुली टेस्ट क्रिकेटला मरू देणार नाही, असं वक्तव्य शोएब अख्तरने केलं आहे.

आयसीसी ४ दिवसांच्या टेस्ट मॅचला बीसीसीआयच्या परवानगीशिवाय मंजुरी देऊ शकत नाही. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या बोर्डांनी एकत्र यावं आणि आपला आवाज उठवावा. तिन्ही देशांच्या दिग्गज खेळाडूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही शोएबने केली आहे.

५ दिवसांऐवजी ४ दिवसांची टेस्ट मॅच खेळवण्यात आली तर क्रिकेटचा कार्यक्रम सुटसुटीत होईल. यामुळे क्रिकेटपटूंवर दबाव येणार नाही, असं आयसीसीकडून सांगण्यात येत आहे. आयसीसीला २०२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपपासून ४ दिवसांच्या टेस्ट मॅचला सुरुवात करण्याची इच्छा आहे.

दुसरीकडे सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, ग्लेन मॅक्ग्रा, गौतम गंभीर या खेळाडूंनीही ४ दिवसांच्या टेस्ट मॅचला विरोध केला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने मात्र याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. याबाबत आत्ता बोलणं घाईचं होईल, असं गांगुली म्हणाला होता.