शतक तर दूरच; केवळ 7 रन्स करणं विराटला जमलं नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतक मारून विराट कोहलीला तब्बल 28 महिने झाले आहेत.

Updated: Mar 14, 2022, 11:16 AM IST
शतक तर दूरच; केवळ 7 रन्स करणं विराटला जमलं नाही title=

बंगळूरू : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचं शतक मारून विराट कोहलीला तब्बल 28 महिने झाले आहेत. यामध्ये त्याने एकून 73 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. यासाठीच श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कोहली उतरणार असल्याचं समजताच चाहत्यांनी त्याच्याकडे शतकाचा तगादा लावला होता. मात्र यावेळी देखील त्याने दोन्ही डावांमध्ये 23 आणि 13 रन्स करत चाहत्यांचा हिरमोड केला आहे. 

दोन्ही डावांमध्ये मिळून कोहलीला केवळ 36 रन्स करता आले. मात्र याचा फटका कोहलीला बसला आहे. त्याच्या या खेळीमुळे त्याच्या टेस्टची सरासरी खाली आली आहे. यावेळी केवळ विराटने केवळ 7 रन्स केले असते तर त्याच्या रन्सची सरासरी 50 पेक्षा अधिक राखण्यात यश आलं असतं.

विराटचं तिन्ही फॉर्मेटमध्ये सरासरी ही 50 पेक्षा अधिक होतं. यावेळी कोहलीला त्याची टेस्टमधील सरासरी राखण्यासाठी बंगळूरूच्या सामन्यात 43 रन्स करणं गरजेचं होतं. मात्र यावेळी त्याला केवळ 36 रन्स करता आले. यामुळे त्याची टेस्टमधील सरासरी 50 हून खाली आली आहे. 

बंगळूरू टेस्ट सामन्यानंतर त्याची सरासरी 49.95 वर आली आहे. ऑगस्ट 2017 नंतर पहिल्यांदा कोहलीची टेस्टमधील सरासरी 50 हून खाली आली आहे.

विराटने त्याच्या कारकिर्दीतील 52व्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध 50 रन्सची सरासरी गाठली होती. 2019 मध्ये कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुण्याच्या टेस्टमध्ये 254 रन्स करून 55.10 ची कारकिर्दीतील सर्वोत्तम फलंदाजी सरासरी गाठली. मात्र त्यानंतर त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. परिणामी त्याच्या फलंदाजीची सरासरी खाली येऊ लागली आणि आता ती 50 पेक्षा कमी आहे.