मुंबई : सौरव गांगुलीचे कर्णधारपद, सचिन तेंडुलकर-राहुल द्रविडचा संघर्ष आणि व्हीव्हीएस लक्ष्मणची खास खेळी ही भारतीय क्रिकेटची दीर्घकाळ ओळख होती. या चौघांनी टीम इंडियाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले. 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाचा 16 कसोटींचा विजय रथ रोखण्याचा प्रसंग क्वचितच विसरला जाईल. त्यानंतर लक्ष्मणने कोलकात्यात 281 धावांची फॉलोऑन इनिंग खेळली, ज्याने केवळ टीम इंडियाच्या विजयाचा पायाच घातला नाही, तर लक्ष्मणला कसोटी क्रिकेटमध्ये एक 'व्हेरी-व्हेरी स्पेशल बॅट्समन' म्हणून ओळख मिळाली.
1 नोव्हेंबर 1974 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या लक्ष्मणचा आज 47 वा वाढदिवस आहे. तेंडुलकर, द्रविड आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज फलंदाज संघात असलेल्या त्या काळात हा भारतीय संघात खेळला. पण लक्ष्मणने स्वतःची जागा निर्माण केली.
क्रिकेटर होण्यापूर्वी लक्ष्मण डॉक्टर होणार होता हे फार कमी लोकांना माहीत असेल. हैदराबादच्या लिटल फ्लॉवर स्कूलमधून बारावी उत्तीर्ण झाल्यावर त्याने एमबीबीएसला प्रवेशही घेतला. पण त्याची क्रिकेटची आवड कमी झाली नाही. आई-वडील दोघंही डॉक्टर असूनही त्यांनी स्वत:चा मार्ग निवडला आणि अखेरीस एमबीबीएस सोडून क्रिकेटमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. हे करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. पण आपल्या जिद्द आणि आवडीच्या जोरावर लक्ष्मणने क्रिकेटमध्ये ते स्थान मिळवलं, ज्याचं त्याने स्वप्न पाहिले होतं.
लक्ष्मणने 1996मध्ये अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होते. काही चांगल्या खेळीनंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि त्याला संघातून वगळण्यात आलं. त्यानंतर 2000 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळालं आणि हा त्याच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरला. 2000 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सिडनी कसोटीत व्हीव्हीएस लक्ष्मणने 167 धावांची उत्तम इनिंग खेळली होती. हे त्याचं पहिलं कसोटी शतक ठरलं होतं.
ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आली होती आणि कोलकाता कसोटीत फॉलोऑन खेळताना लक्ष्मणने 281 धावा केल्या. ज्याची कसोटी इतिहासातील सर्वोत्तम खेळींमध्ये गणना केली जाते. लक्ष्मणच्या द्विशतकामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा 16 कसोटींचा विजय रथ रोखला. 2003-04 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही लक्ष्मणची बॅट कांगारू संघाविरुद्ध जोरदार तळपली होती. त्यानंतर त्याने 2 शतके झळकावली होती.
लक्ष्मणने भारतासाठी 134 कसोटी सामन्यांमध्ये 45 पेक्षा जास्त सरासरीने 8781 धावा केल्या. यामध्ये 17 शतके आणि 56 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 6 शतके झळकावली. यापैकी केवळ 4 ऑस्ट्रेलियाविरुद्धची आहेत. लक्ष्मण हा सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 हून अधिक कसोटी धावा करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.