World Cup: ज्या संघाकडून आधी खेळला नंतर त्यालाच पराभूत करत ठरला Man Of The Match

World Cup 2023 Cricket History: या खेळाडूने पूर्वी ज्या संघाकडून सामने खेळले त्याच संघाविरोधात नाबाद खेळी करत केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही जिंकला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 28, 2023, 04:44 PM IST
World Cup: ज्या संघाकडून आधी खेळला नंतर त्यालाच पराभूत करत ठरला Man Of The Match  title=
त्यांनी आपल्याच आधीच्या संघाला पराभूत करण्याची कामगिरी केली

World Cup 2023 Cricket History: एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकप स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंविरुद्धच्या सामन्याने 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दीड महिने चालणारी ही स्पर्धा भारतात खेळवली जाणार असल्याने पुढील 45 दिवस भारतात क्रिकेट हा चर्चेचा विषय ठरणार आहे. स्कोअर काय झाला? कोणता संघ उपांत्य फेरीत जाणार? कोण कशी कामगिरी करणार याची चर्चा नाक्यापासून ते ऑफिसपर्यंत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 वेळा वर्ल्डकपची स्पर्धा खेळवली गेली आहे. या सर्वच स्पर्धा फारच रंकज राहिल्या आहेत. अनेक खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 48 वर्षांहून अधिकचा इतिहास असलेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये काही खेळाडू तर 2 वेगवेगळ्या देशांकडूनही खेळले आहेत. विशेष म्हणजे यात एक असा खेळाडू आहे ज्याने आपल्याच आधीच्या संघाविरुद्ध खेळताना थेट 'प्लेअर ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकला होता. 

कोण आहे हा खेळाडू?

दक्षिण आफ्रिकेमधील ब्लोमफोंटेन येथे जन्मलेले केपलर वेसल्स (Kepler Wessels) हे एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका अशा दोन्ही संघांकडून खेळले आहेत. ज्यावेळी वर्णद्वेषाच्या कारणाने दक्षिण आफ्रिकेवर बंदी घालण्यात आली तेव्हा केपलर वेसल्स हे ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून खेळले होते. ते 1983 च्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळत होते. या वर्ल्डकपमध्ये त्यांनी 3 सामन्यांमध्ये 30.66 च्या सरासरीने 92 धावा केल्या होत्या. त्यावेळी 76 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

नंतर दुसऱ्याच संघाकडून खेळले

1991 मध्ये दक्षिण आफ्रिकेवरील बंदी हटवण्यात आल्यानंतर केपलर वेसल्स यांची थेट दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदी वर्णी लागली. 1992 साली खेळवण्यात आलेल्या वर्ल्डकप स्पर्धमध्ये केपलर वेसल्स यांनी दक्षिण आफ्रिकेकडून खेळताना उत्तम कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने चमकदार कामगिरी करत सर्वांना आपली दाखल घ्यायला भाग पाडलं. केपलर वेसल्स यांनी या वर्ल्डकपमध्ये 9 सामने खेळताना 44.71 च्या सरासरीने 313 धावा केल्या. यामध्ये 3 अर्धशतकांचा समावेश होता. त्यांनी नाबाद 85 आणि 81 धावांच्या 2 अविस्मरणीय खेळी केल्या होत्या.

नक्की वाचा >> 'त्या' 550 कोटींमुळे पाकिस्तानी संघ थेट भारतात न येता Via Dubai आला; जाणून घ्या कारण

कोणत्या सामन्यात केली ही खेळी?

विशेष म्हणजे केपलर वेसल्स यांनी त्यांच्या संस्मरणीय खेळीपैकी 81 धावांची खेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. ज्या संघामधून ते 1983 साली खेळले त्याच संघाविरुद्ध त्यांनी 81 धावांची खेळी केली. 1992 च्या वर्ल्डकपचं आयोजन आस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये संयुक्तरित्या करण्यात आलं होतं. सिडनीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाने 49 ओव्हरमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या होत्या. डेव्हिड बून आणि स्टीव्ह वॉ यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या एलन डोनाल्ड यांनी सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाने दिलेलं 171 धावांचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने 46.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि ते ही केवळ एका गड्याच्या मोबदल्यात. 

नक्की वाचा >> 'तो तर आमच्या जावयासारखा'; भारतीय क्रिकेटपटूबद्दल शाहरुखच्या विधानाने अनेकांच्या भुवया उंचावल्या

सामनाही जिंकला आणि पुरस्कारही पटकावला

डावखुऱ्या हाताचे सलामीवर केपलर वेसल्स यांनी नाबाद 81 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. पीटर कर्स्टन यांनी 49 धावा केल्या आणि ते सुद्धा नाबाद राहिले. या सामन्यामध्ये केपलर वेसल्स यांनी संघाला विजय मिळवून देतानाच सामनावीर पुरस्कारही पटकावला. या खेळीची झलक तुम्ही खालील व्हिडीओत पाहू शकता...

कारकीर्द कशी?

केपलर वेसल्स यांनी 40 कसोटी सामने आणि 109 एकदिवसीय सामने खेळले. त्यांची कसोटीमधील सरासरी 41.00 इतकी होती. त्यांनी 2788 धावा केल्या ज्यात 6 शतकांचा समावेश होता. तर एकदिवसीय सामन्यामध्ये केपलर वेसल्स यांची सरासरी 34.35 इतकी होती.

नक्की वाचा >> भारताच्या पाहुणचाराने पाकिस्तानी खेळाडू भारावले! Insta Stories चर्चेत; बाबर म्हणतो, 'इथलं प्रेम...'

केपलर वेसल्स यांनी एका शतकासहीत एकदिवसीय सामन्यांमध्ये 3367 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर 18 विकेट्सही आहेत.