World Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं

भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी पाकिस्तानविरोधातील सामन्यात शुभमन गिल नक्की खेळेल असं सांगितलं आहे. गुरुवारी शुभमन गिल नेट प्रॅक्टिसमध्ये सहभागी झाला होता.   

शिवराज यादव | Updated: Oct 13, 2023, 04:37 PM IST
World Cup 2023: शुभमन गिल पाकिस्तानविरोधात खेळणार की नाही? अखेर उत्तर मिळालं title=

भारत-पाकिस्तान सामन्यात भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल खेळणार की नाही याची सर्वाधिक उत्सुकता आहे. वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असतानाच डेंग्यू झाल्याने शुभमन गिल पहिल्या दोन्ही सामन्यात खेळू शकला नाही. दरम्यान, शुभमन गिल अहमदाबादमध्ये दाखल झाला असून, सरावही केला असल्याने तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. यादरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड प्रमुख एमएसके प्रसाद यांनी शुभमन गिल पाकिस्तानविरोधातील सामन्यात नक्की खेळेल असं म्हटलं आहे. 14 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान संघ भिडणार आहेत. 

शुभमन गिलने 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये काही लक्षणीय खेळी केल्या आहेत. 20 एकदिवसीय सामन्यात त्याने 72.35 च्या सरासरीने 1230 धावा केल्या असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 105.03 आहे. शुभमनने 2023 मध्ये 6 शतकं ठोकली आहेत. सहावं शतक ठोकत शुभमन गिलचं नाव विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि इतर महान खेळाडूंसह एका वर्षात सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झालं आहे. 

वर्ल्डकप स्पर्धेआधी डेंग्यू झाल्याने शुभमन गिलला चेन्नईच्या कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या होत्या. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्याची रिकव्हरी सुरु होती. त्यामुळे पाकिस्तानविरोधातील हायव्होल्टेज सामन्यात तो खेळणार नाही की नाही याबाबत साशंकता होती. पण त्याच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत असल्याने पाकिस्तानविरोधात तो खेळण्याची शक्यता बळावली आहे. 

शुभमन गिल अहमदाबादमध्ये असून सरावातही सहभागी झाला आहे. यादरम्यान एमएसके प्रसाद यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सरावातील त्याचा खेळ पाहता तो नक्की खेळेले असं म्हटलं आहे. "मला वाटतं आता आपण सर्व अंदाजांना पूर्णविराम देऊ शकतो. शुभमन गिल पाकिस्तानविरोधातील सामन्यात नक्की खेळेल. तो खूप चांगला खेळाडू असल्याने, त्याला बाहेर ठेवणं परवडणारं नाही. त्याला फक्त ताप होता. तो आता बरा झाला आहे. आजार फार धोकादायक नसल्याने बदली खेळाडूचा विचार करण्याची गरज नाही. त्याच्या आजाराबद्दल फक्त अफवा आहेत," असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

"त्याच्याबद्दल जे काही ऐकलं ती पूर्वकाळजी होती. पूर्वकाळजी म्हणूनच त्याला चेन्नईत आणखी एक दिवस ठेवण्यात आलं होतं. तो आता बरा झाला असून, डिस्चार्ज मिळाला आहे. जर एखादा खेळाडू 1 तासापेक्षा जास्त खेळत असेल, याचा अर्थ तो बरा झाला आहे. पाकिस्तानविरोधातील सामना फार महत्त्वाचा आहे. जर तो फिट असेल तर त्याला प्लेईंग 11 मध्ये खेळला पाहिजे," असं एमएसके प्रसाद यांनी सांगितलं.

प्रसाद यांनी यावेळी शुभमन गिलच्या अहमदाबादमधील मैदानावरील रेकॉर्डचाही संदर्भ दिला. "या मैदानावर त्याने जबरदस्त क्रिकेट खेळलं आहे. त्याला या मैदानाची उत्तम जाण आहे. त्याला इथे धावा कशा काढायच्या हे माहिती आहे. त्याचा रेकॉर्ड पाहता त्याने नक्की खेळलं पाहिजे. अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात त्याची गरज नव्हती. पण पाकिस्तानविरोधात त्याची गरज आहे," असं ते म्हणाले आहेत.