World Cup 2023 India vs Bangladesh: भारत आणि बांगलादेशमध्ये वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये आज सामना होणार आहे. पुण्यामध्ये हा सामना होणार असून काही दिवसांपूर्वीच दोन्ही संघ या सामन्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. भारताने या वर्ल्ड कपमधील आपले पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. या सामन्यामध्ये भारताचं पारडं जड वाटत असलं तरी बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. भारताला यापूर्वी बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत केलं आहे. भारताला 2007 साली झालेल्या स्पर्धेमध्ये बांगलादेशने पराभूत केलं होतं. नेमकं या सामन्यात काय घडलेलं पाहूयात...
17 मार्च 2007 रोजी बी ग्रुपमधील भारत आणि बांगलादेशदरम्यान सामना झाला होता. हा सामना भारत जिंकेल असं गृहित धरलं जात होतं. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यातील तिसऱ्याच ओव्हरमध्ये विरेंद्र सेहवागला मुशरफी मुर्तझाने बोल्ड केलं आणि भारताचा डाव गडगडण्यास सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 21 वर असताना रॉबीन उथप्पा तंबूत परतला. त्यानंतर संघाच्या धावसंथ्येत 19 धावांची भर पडल्यावर सचिन तेंडुलकर 7 धावांच्या वैयक्तिक स्कोअवर तंबूत परतला. त्यालाही मुशरफी मुर्तझाने बाद केलं. त्यानंतर भारताची चौथी विकेट कर्णधार राहुल द्रविडच्या रुपात पडली. द्रविड 25 व्या ओव्हरमध्ये भारताची धावसंख्या 72 वर असताना तंबूत परतला. युवराज सिंग आणि सौरभ गांगुलीने भारताची पडझड थांबवली. युवराजने 47 धावा केल्या. युवराज बाद झाला तेव्हा भारताचा स्कोअर 157 होता. यात एका धावाची भर पडल्यानंतर सेट झालेला सलामीवीर सौरव गांगुली 66 धावांवर बाद झाला.
महेंद्रसिंग धोनी शून्यावर बाद झाला झाला. त्यापाठोपाठ हरभजन सिंग आणि अजित आगरकर सुद्धा भोपळाही न फोडता तंबूत परतले आणि भारताची स्थिती 159 वर 9 बाद अशी झाली. मुनाफ पटेल आणि जहीर खानने प्रत्येकी 15 धावांची भर घालत भारताला किमान 190 धावांचा टप्पा गाठण्यास मदत केली. मुनफाच्या रुपाने भारताची 10 वी विकेट पडली.
192 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगलादेशचीही सुरुवात अडखळतीच झाली. तमीन इक्बाल आणि नासीफने संयमी सुरुवात केली तरी नासीफ 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर 69 धावांवर स्कोअरकार्ड असताना तमीम इक्बाल अर्धशतक झळकावून तंबूत परतला. त्यानंतर आफताब अहमद 16 व्या ओव्हरला तंबूत परतला. नंतर शाकीब अल हसन आणि मुस्तफीजूर रेहमानने 80 धावांहून अधिकची पार्टरनशीप केली. शाकीब 53 धावा करुन बाद झाला. त्यानंतर हिजबुल बशरच्या रुपात बांगलादेशची 5 वी विकेट पडली. पण 48.3 ओव्हरमध्ये बांगलादेशने 192 धावांचा टप्पा गाठला आणि सामना जिंकला.
हा पराभव भारताच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळेच बांगलादेशचा सध्याचा संघ पाहता आताही त्यांना हलक्यात घेणं धोक्याचं ठरु शकतं.