संपूर्ण क्रिकेटविश्वाचं लक्ष लागून राहिलेल्या क्रिकेट वर्ल्डकपला अखेर सुरुवात झाली आहे. यावर्षी भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार हे नक्की आहे. दरम्यान वर्ल्डकपमुळे भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 22 हजार कोटी जमा होतील आणि मोठं पाठबळ मिळेल असा अंदाज बँक ऑफ बडोद्याच्या अर्थतज्ज्ञांनी मांडला आहे.
5 ऑक्टोबरपासून भारतात वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे. यादरम्यान जगभरातील अनेक चाहते या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी भारतात दाखल होतील. ही संख्या लाखो, करोडोंमध्ये असणार आहे. तसंच वर्ल्डकपमधील सामने देशातील 10 शहरांमध्ये होणार आहेत. यामुळे ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी या दोन्ही क्षेत्रांना मोठा फायदा होणार आहे, असं अर्थतज्ज्ञ जान्हवी प्रभाकर आणि अदिती गुप्ता यांनी म्हटलं आहे.
2011 नंतर पहिल्यांदाच भारतात वर्ल्डकप स्पर्धा पार पडत आहे. भारतात एकीकडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे अनेक सणदेखील साजरे होणार आहे. स्पर्धेच्या तीन महिन्यांमध्ये दिवाळी, दसरा यासह अनेक सण आहेत. यामुळे लोक भावनेच्या आहारे मोठ्या प्रमाणात खरेदी करतील, ज्याचा फायदा रिटेल क्षेत्राला होणार आहे.
अर्थतज्ज्ञांच्या मते, वर्ल्डकप स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या यावेळी अधिक असेल आणि अनेक रेकॉर्ड्स मोडले जातील. 2019 मध्ये टीव्ही आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मवर 552 मिलियन प्रेक्षकसंख्या होती. यावेळी ही संख्या फार अधिक असेल. यामुळे टीव्ही हक्क आणि प्रायोजकत्व महसूलातून 10,500 कोटी ते 12,000 कोटींचं उत्पन्न मिळू शकतं.
तथापि, विश्वचषकामुळे महागाईत वाढ होण्याचीही शक्यता आहे. या कालावधीसाठी विमान तिकिटं, हॉटेलचे भाडं वाढले आहे आणि 10 यजमान शहरांमधील अनौपचारिक क्षेत्रातील सेवा शुल्कात सणासुदीच्या हंगामाच्या प्रभावाच्या शीर्षस्थानी लक्षणीय वाढ होऊ शकते, असं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे. एकूणच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरसाठी महागाई 0.15 टक्के ते 0.25 टक्के दरम्यान वाढू शकते, असं ते म्हणाले आहेत.
तसंच वर्ल्डकप स्पर्धेमुळे केंद्र सरकारच्या तिजोरीस मोठा हातभार लागणार आहे. तिकिट विक्रीवरील वाढीव कर संकलन, हॉटेल्स, रेस्तराँ आणि खाद्यपदार्थांच्या वितरणावरील वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तिजोरीला मदत मिळेल.ज्यामुळे देशाला अतिरिक्त आर्थिक फायदा मिळेल असं अर्थतज्ज्ञांनी सांगितलं आहे.
याशिवाय एका सेकंदाच्या जाहिरातासाठी 3 लाख रुपये आकारले जात आहे. आयसीसीच्या स्पर्धेदरम्यान आपलं नाव झळकावं यासाठी आंतरराष्ट्रीय ब्रँण्ड्स करोडो खर्च करत आहेत. जाहिरातींवर ब्रॅण्ड्स 2000 कोटी खर्च करण्याचा अंदाज आहे.