रोहित शर्माने World Cup मध्ये रचला इतिहास; ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज

एकदिवसीय क्रिकेटमध्ये रोहित शर्मा हा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे, ज्याने कॅलेंडर वर्षात 50 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Oct 23, 2023, 12:47 PM IST
रोहित शर्माने World Cup मध्ये रचला इतिहास; ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय फलंदाज title=

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात चांगली कामगिरी करत असल्याचा फायदा संघाला होत आहे. फलंदाजीबद्दल बोलायचं गेल्यास भारतीय कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज रोहित शर्माच्या तडाखेबंज फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. रविवारी न्यूझीलंड संघाविरोधातील सामन्यातही रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. यासह रोहित शर्मा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे. 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये कॅलेंडर वर्षात 50 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकणार रोहित शर्मा हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा तिसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माच्या आधी दक्षिण आफ्रिकेचा एबी डेव्हेलियर्स आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांनी हा रेकॉर्ड केला आहे. त्यांनी कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. रविवारी न्यूझीलंडविरोधातील सामन्यात दुसऱ्या ओव्हरला मॅट हेनरीला षटकार ठोकत रोहित शर्माने या रेकॉर्डला गवसणी घातली. 

रोहित शर्माने एकूण 53 षटकार ठोकले आहेत. या यादीत एबी डेव्हेलियर्स पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2015 मध्ये 58 षटकार ठोकले होते. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ख्रिस गेलने 2019 मध्ये 56 षटकार ठोकले होते. यानंतर 53 षटकारांसह रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

न्यूझीलंडने भारतीय संघाला 274 धावांचं आव्हान दिलं होतं. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माने तुफान फटकेबाजी करत 46 धावा ठोकल्या. 12 व्या ओव्हरला तो बाद झाला. विजयानंतर त्याने सांगितलं की, "स्पर्धेला चांगली सुरुवात झाली आहे. अर्धी कामगिरी पार पडली आहे. आम्ही जास्त विचार करत नाही आहोत. आम्ही वर्तमानात जगत आहोत. मोहम्मद शामीने मिळालेल्या संधीचा चांगला फायदा घेतला आहे. त्याला अशा स्थितीत खेळण्याचा अनुभव असून, तो एक क्लास खेळाडू आहे. एका स्थितीला आम्हाला धावसंख्या 300 च्या पुढे जाईल असं वाटलं होतं. याचं सर्व श्रेय आमच्या फलंदाजांना आहे. मी फलंदाजीचा आनंद लुटत आहे. मी आणि शुभमन पूर्णपणे वेगळे असून एकमेकासह खेळताना आनंद लुटत आहोत".

आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. यापेक्षा जास्त काही मला सांगायचं नाही. विराट कोहलीने याआधीही अनेकदा अशी कामगिरी केली आहे. आम्ही विकेट गमावले असताना कोहली आणि जडेजाने पुन्हा सामन्यात आणलं असं सांगत रोहित शर्माने कौतुक केलं. 

भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी कऱण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने भारतासमोर 273 धावांचं आव्हान ठेवलं होतं. सुरुवातीचे विकेट्स गमावल्यानंतर मिशेल 130 आणि रचिन रवींद्रने 75 धावा ठोकत 159 धावांची भागीदारी केली. विश्वचषकात कोणत्याही विकेटसाठी दोन्ही संघांमधील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. याआधी 1987 मध्ये सुनील गावसकर आणि श्रीकांत यांनी 136 धावांची भागीदारी केली होती. 

पण नंतर मोहम्मद शामीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंड संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. मोहम्मद शामीने 54 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या.