Honda Electric Scooter: आज कंपनीने या इलेक्ट्रिक गाड्यांसंदर्भातील घोषणा करताना पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध असतील असं म्हटलं आहे. कंपनीच्या सीईओंनी या नव्या स्कूटरसंदर्भातील माहिती दिली आहे.
Honda Electric Scooter: होंडा कंपनीची अॅक्टिवा देशातील सर्वात विकली जाणारी स्कूटर आहे. अॅक्टिवावर लोकांचा फार विश्वास आहे. शहरी भागामध्ये या स्कूटरला मोठी मागणी आहे. याच कारणामुळे अॅक्टिवाची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारामध्ये लॉन्च होण्याची अनेकजण वाट पाहत होते. सध्या बाजारपेठेमध्ये जुन्या, नव्या अनेक कंपन्यांच्या स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र अॅक्टिवाची लोकप्रियता पाहता या गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन कधी लॉन्च होतं याबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. होंडाने लवकरच भारतामध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स लॉन्च करणार असल्याची घोषणा केली आहे. होंडाच्या या घोषणेमुळे इतर इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपन्यांची चिंता वाढली आहे.
'होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया'ने पुढील वर्षी देशात आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने यासंदर्भातील माहिती दिली आहे. हे मॉडेल 2024 मध्ये भारतात लॉन्च होणार आहे. कंपनी पुढील आर्थिक वर्षापासून अनेक बाईक्स लॉन्च करणार आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटरच्या लांबलचक यादीमध्ये अॅक्टीव्हा ही होंडाची पहिली दुचाकी असणार आहे, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असतानाच होंडाने या कॅटेगरीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. होंडाने सोमवारी आपल्या अॅक्टिवा 6 जी एच-स्मार्ट स्कूटरच्या लॉन्चच्या वेळेस ही घोषणा केली.
होंडा इंडियाचे अध्यक्ष आणि सीईओ अत्सुगी ओगाता यांनी, "आम्ही पुढील वर्षी मार्च महिन्यात पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहे. संपूर्णप्रकारे नव्यापद्धतीच्या तंत्रज्ञानावर आधारित या स्कूटर असतील. याचं डिझाइनही भारतीय ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आलेलं आहे," अशी माहिती दिली. पुढील वर्षी बाजारात येणाऱ्या या गाडीमध्ये फिक्स बॅटरी असणार आहे. तर दुसऱ्या मॉडेलमध्ये बदलता येणारी बॅटरी असेल. ओगाता यांनी आपल्या ईव्ही सीरीजच्या चार्जिंग मॅन्युफॅक्टरिंग प्लॅट उभारण्यासाठी सहा हजारांहून अधिक आऊटलेट्सचा या गाडीच्या विक्रीसाठी वापर करणार आहे.
होंडाने आपल्या भारतामधील ईव्ही उद्योगमध्ये नेमकी किती गुंतवणूक करण्यात आली आहे याबद्दलची माहिती दिलेली नाही. सध्या इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रामध्ये होंडाचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी असलेली हीरो इलेक्ट्रिक आघाडीवर आहे. याशिवाय ओला इलेक्ट्रिक, ओकिनावा सारख्या कंपन्यानी दखलपात्र कामगिरी करत आहेत. सध्या या बाजारपेठेतील 56 टक्के हिस्सेदारी होंडाची आहे.