ST Bus Driver Problems: एसटी महामंडळात महत्त्वाची प्रवासी सेवा बजावणारे चालक आणि वाहक यांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहेत. स्वत:चा जीव टांगणीला लावून हे कर्मचारी सेवा बजावत आहेत. गडचिरोलीत सेवा देणाऱ्या एका ST ड्रायव्हरला धक्कादायक अनुभव आला आहे.रात्रीच्या वेळेस प्रवास करणाऱ्या ST ड्रायव्हरने भर जंगलात बस थांबवून अधिकाऱ्यांना फोन लावून आपली समस्या सांगितली. मात्र, अधिकाऱ्याने समोरुन जे उत्तर दिले ते उत्तर ऐकूण 'तळपायाची आग मस्तकात जाईल'.
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी आगाराच्या अनेक बस नादुरुस्त आहे. हेडलाईट नसतानाही या बस रस्त्यावर धावत आहेत. अहेरी -भंडारा बसच्या 40 प्रवाशांना धक्कादायक अनुभव आला. गडचिरोलीहून निघालेली बस ऐन जंगलात थांबवून चालकाने अधिकाऱ्यांना फोन केला आणि बसचे हेडलाईट बंद असल्याचे सांगितले. ''बस नदीत फेकून दे'' असे उत्तर अधिकाऱ्याने दिले. राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांप्रती एसटीचे अधिकारी संवेदनहीन झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
14 मे रोजी गडचिरोली येथून भंडाराच्या दिशेने जाणाऱ्या अहेरी डेपोच्या जलद बस क्रमांक एम एच 40 8492 मध्ये सायंकाळी 7 वाजता गडचिरोली येथुन काही प्रवासी बसले. यात 7 ते 8 मित्रांचा समावेश होता. धक्कादायक बाब म्हणजे बसचे हेडलाईट नादुरुस्त होते. लांब पल्ल्याच्या या बसला अंधारात चालविताना एसटी चालकाला अनेक अडचणी येत होत्या.
एसटी चालक येलुरकर व वाहक एस. कलिए यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी डेपोमधील एसटी महामंडळाच्या अधिकारी आडे यांना संपर्क केला. हेडलाईट बंद असल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. प्रवासी चालकाच्या बाजूला उभे असताना चालकाने अधिकाऱ्याला फोनवर सत्य परिस्थिती सांगितली व या प्रवाशांना या बंद हेडलाईटच्या एसटीने कसे सुखरूप पोचवू असा प्रश्न केला. त्यावर अधिकाऱ्याने "काहीही कर. आण नाहीतर एसटी नदीत फेकुन दे" असे म्हणत हात झटकले.
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना राज्याच्या ग्रामीण भागातील प्रवाशांच्या जीवाची चिंता नाही का? असा सवाल करl प्रवाशांनी आक्रोश व्यक्त केला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि बस मध्ये असलेल्या 40 ते 50 प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करुन निलंबन करण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.