Benjamin Netanyahu On Canadian PM Justin Trudeau: खलिस्तान दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्या प्रकरणामध्ये भारताबरोबर शाब्दिक वाद घालणारे कॅनडाने आता इस्रायलला अक्कल शिकवण्याचा प्रयत्न केला. हमास आणि इस्रायलमध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान गाझामधील मृताच्या आकडेवारीचा संदर्भ देत या मृत्यूंसाठी इस्रायल जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे कॅनडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं आहे. मात्र या विधानानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ट्रूडो यांना सुनावलं आहे. गाझा पट्टीमध्ये केलेली कारवाई योग्य असल्याचं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रूडो यांनी गाझा पट्टीसंदर्भात केलेल्या विधानावर बोलताना बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायल सर्वसामान्यांवर हल्ला करत नसून हमासच सर्वसामान्यांना लक्ष्य करत असल्याचं म्हटलं आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांनी गाझामध्ये झालेल्या मृत्यूंबद्दल चिंता व्यक्त केली. ट्रूडो यांनी इस्रायल सरकारने संयम बाळागावा असंही म्हटलं. हमास आणि इस्रायलमध्ये युद्धाला 40 दिवस पूर्ण झाले असून युद्ध अजूनही सुरु असतानाच ट्रूडो यांनी इस्रायलवर निशाणा साधला. गाझा पट्टीमध्ये महिला आणि मुलांच्या हत्या बंद झाल्या पाहिजे. यावर उत्तर देताना बेंजामिन नेतन्याहू यांनी, गाझामध्ये सर्वसामान्य नागरिकांना इस्रायल नाही तर हमास लक्ष्य करत आहे असा दावा केला आहे.
कॅनडियन पंतप्रधानांनी इस्रायल सरकारने अधिक संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. जग टीव्ही आणि सोशल मीडियावर सर्व काही पाहत आहे. डॉक्टर, वाचलेले लोक, पालक गमावलेली मुलांच्या प्रतिक्रिया आपण ऐखत आहोत, असं ट्रूडो म्हणाले होते. पश्चिमेकडील ब्रिटीश कोलंबिया येथे एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रूडो यांनी महिला, लहान मुलं आणि बालकांची हत्या संपूर्ण जग बघत आहे. हे थांबवायला हवं. हमासने पॅलेस्टाईनच्या नागरिकांना मानवी ढाल बनवून हल्ले करणं थांबवलं पाहिजे आणि सर्व ओलीस लोकांना सोडलं पाहिजे, असं ट्रूडो यांनी म्हटलं होतं.
बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटरवरुन एक पोस्ट केली आहे. "मुद्दाम नागरिकांवर हल्ले इस्रायल करत नसून हमासच करत आहे. हमासने नरसंहारामध्ये यहूदिंवर झालेल्या सर्वात भयानक हल्ल्यामध्ये नागरिकांची डोकी छाटली. अनेकांना जाळून मारलं आणि नरसंहार घडवून आणला. इस्रायल सर्वसामान्यांना होणाऱ्या नुकसानापासून दूर ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे हमास त्यांना नुकसान पोहचवण्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहेत," असं बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
It is not Israel that is deliberately targeting civilians but Hamas that beheaded, burned and massacred civilians in the worst horrors perpetrated on Jews since the Holocaust.
While Israel is doing everything to keep civilians out of harm’s way, Hamas is doing…
— Benjamin Netanyahu - בנימין נתניהו (@netanyahu) November 15, 2023
इस्रायलने गाझामधील नागरिकांना सुरक्षित बाहेर पडता यावं म्हणून सेफ पॅजेस तयार केले आहे. तर दुसरीकडे हमास बंदुकीचा धाक दाखवून नागरिकांना बाहेर जाण्यापासून रोखण्याचं काम हमास करत असल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या युद्ध अपराधासाठी हमासला जबाबदार ठरवलं पाहिजे, इस्रायलला नाही, असंही बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. सामान्य नागरिकांमध्ये मिसळून त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम हमासच करत आहे. जगातील सर्व सभ्य देशांनी हमासच्या या हिंसाचाराला थांबवण्यासाठी इस्रायलचं समर्थन केलं पाहिजे, असंही बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.