'त्या' ४५ जणांवर कोरोनाच्या लसीचा पहिला प्रयोग

हा एक इतिहासच म्हणा... 

Updated: Mar 18, 2020, 01:03 PM IST
'त्या' ४५ जणांवर कोरोनाच्या लसीचा पहिला प्रयोग  title=
संग्रहित छायाचित्र

न्यूयॉर्क : जगभरातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनचं संकट आलेलं असतानाच दुसरीकडे कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी वैद्यकशास्त्रात अनेकजण प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळत आहे. याच तणावाच्या परिस्थितीत आता कोरोना व्हायरसवरील लसीची मानवावरील चाचणी सुरु करण्यात आली आहे. अमेरिकेत या चाचणीची सुरुवात झाली आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाच्या चाचणीचा हा पहिलाच स्तर आहे. सिएटलमध्ये Kaiser Permanente Washington Health Research Institute (KPWHRI) येथे ही चाचणी सुरु करण्यात आली आहे. जेथे संशोधनप्रक्रियेअंतर्गत असणारी लस पहिल्या व्यक्तीला देण्यात आली आहे. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याविषयीची माहिती दिली. 'मला सांगण्यास समाधान वाटत आहे, की लसीकरणासाठीच्या व्यक्तीने चाचणीच्या पहिल्या टप्प्यास सुरुवात केली आहे. इतिहासात सर्वाधिक वेगाने तयार केलेली ही आतापर्यंतची एकमेव लस आहे. आम्ही एँटीव्हायरल थेरेपी आणि इतर सर्व उपचारांसाठीही प्रयत्नशील आहोत', असं ट्रम्प म्हणाले. 

मॉडर्ना या लस तयार करणाऱ्या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या स्वयंसेवकाला पहिल्याच टप्प्यात चाचणीसाठी ही लस देण्यात आली आहे. या चाचणी प्रक्रियेमध्ये एकूण ४५ जणांचा समावेश आहे. mRNA-1273 नामक या लसीला आणखी दोन टप्प्यांमधून जावं लागणार आहे. ज्यानंतर त्यापासून होणारे चुकीचे परिणाम होणार नसल्याची बाबही तपासली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी कमीतकमी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे,ज्यानंतर ही लस अधिकृतपणे उपलब्यध होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

कोरोनाची ही लस दोन ते तीन महिन्यांमध्ये तयार होणं अपेक्षित होतं. पण, ही लस अवघ्या ६५ दिवसांमध्येच चाचणीसाठी तयार झाली. त्यामुळे ही एक ऐतिहासिक घटना ठरत आहे. दरम्यान, या चाचणी प्रक्रियेसाठी १८ ते ५५ वोगटातील ४५जणांचा सहभाग असणार आहे. वर्षभर चालणाऱ्या प्रक्रियेत ते सहभागी असतील. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यावरील लसीच्या चाचणीची प्रक्रिया नेमकी कोणत्या गतीने पुढे जाते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.