पुलवामा दहशतवादी हल्ला ही भयानक स्थिती - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

Updated: Feb 20, 2019, 08:34 AM IST
पुलवामा दहशतवादी हल्ला ही भयानक स्थिती - राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प title=

वॉशिंग्टन : पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला ही भयावह स्थिती असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी केली आहे. या हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान यांच्यात एकमेकांविरोधात संघर्ष वाढला असल्याचं ट्रम्प म्हणाले. दक्षिण आशियातले हे दोन शेजारी एकत्र नांदल्यास परिस्थिती सुंदर होईल असं देखील ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताला स्व संरक्षणाचा पूर्ण अधिकार असून अमेरिका प्रत्येक कारवाईत भारताला मदतच करेल असं याआधीच ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी म्हटलं आहे.

मंगळवारी ट्रम्प यांनी म्हटलं की, 'या प्रकरणात रिपोर्ट आल्यानंतर लवकरच याबाबतची भूमिका जाहीर केली जाईल. मी ही घटना पाहिली आहे. मला याबाबत अनेक रिपोर्ट मिळाले आहेत. योग्य वेळ आल्यानंतर लवकरच यावर उत्तर दिलं जाईल.' 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली होती.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे उपप्रवक्ता यांनी म्हटलं की, अमेरिका भारत सरकारच्या संपर्कात आहे. आम्ही शोक संदेशसह संपूर्ण समर्थन देत आहोत. आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी पूर्ण सहकार्य करावं आणि जे याला जबाबदार आहेत त्यांना शिक्षा द्यावी.'