डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर जो बायडेन यांचा पाकिस्तानला जोरदार झटका

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय बायडेेन प्रशासनाने ही कायम ठेवला आहे.

शैलेश मुसळे | Updated: May 25, 2021, 02:33 PM IST
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर जो बायडेन यांचा पाकिस्तानला जोरदार झटका title=

मुंबई : अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर बायडेन प्रशासनाने सुरक्षा मदतीसाठी पाकिस्तानला आर्थिक मदत न देण्याचा निर्णय कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन आणि पाक जनरल चीफ कमर जावेद बाजवा यांच्यात सोमवारी झालेल्या संभाषणानंतर पेंटॅगॉनने ही माहिती दिली आहे.

पेंटागॉनचे प्रेस सचिव जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तानला देण्यात येणारी अमेरिकन सुरक्षा मदत बायडेन प्रशासनात ही स्थगित केली आहे. भविष्यात हे बदलेल की नाही याचा मी अंदाज लावणार नाही.'

बायडेन प्रशासनाने ट्रम्प प्रशासनाच्या धोरणांचा आढावा घेतला आहे का? आणि पाकिस्तानशी चर्चेदरम्यान आर्थिक मदतीच्या मुद्यावर चर्चा झाली आहे का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिले.

जानेवारी 2018 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देण्यात येणारी सर्व सुरक्षा मदत बंद केली होती. यावेळी त्यांनी असा युक्तिवाद केला होता की दहशतवादाविरूद्धच्या लढाईत पाकिस्तानच्या सहकार्य व भूमिकेबाबत आपण समाधानी नाही.

त्याआधी किर्बी म्हणाले की, ऑस्टिन यांनी जनरल बाजवा यांच्याशी प्रादेशिक हितसंबंध आणि उद्दीष्टांवर चर्चा बैठक केली. ते म्हणाले, "चर्चेदरम्यान सचिवांनी अफगाणिस्तानमध्ये शांतता चर्चेसाठी पाकिस्तानच्या पाठिंब्याचे कौतुक केले आणि अमेरिका-पाकिस्तान द्विपक्षीय संबंध कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली."

ऑस्टिन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मी अमेरिका-पाकिस्तान संबंधांचे कौतुक केले आहे आणि प्रादेशिक सुरक्षा आणि स्थिरता वाढविण्यासाठी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे." एक दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी आपला पाकिस्तानचे मोईद युसूफ यांची जिनिव्हा येथे भेट घेतली. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते एमिली हॉर्न म्हणाले की, 'दोन्ही पक्षांनी परस्पर हितसंबंधांच्या अनेक द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक विषयांवर आणि व्यावहारिक सहकार्याच्या मार्गांवर चर्चा केली. त्यांनी चर्चा सुरू ठेवण्यासाठी सहमती दर्शविली आहे.'