नवी दिल्ली : अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.
त्याच चित्रीकरणादरम्यान कमल कुमार नावाचा एक इसम सेटवर आला होता. त्याने व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन अर्जुनची भेट घेतली. त्यावेळी कमल कुमार मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने अर्जुनला हात मिळवण्याची विनंती केली. अर्जुनने हात पुढे केला असता त्याने अर्जुनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सुत्रांनी दिली.
कमल ड्रायव्हर असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, पोलिसांनी त्याच्यावर मद्यप्राशन करुन गाडी चालवण्याचा गुन्हाही दाखल केला आहे. त्याची गाडीही जप्त करण्यात आली आहे.
पिथौरागढ पोलीस ठाण्याचे प्रभारी ध्यान सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने अर्जुनला हात मिळवताना अचानक त्याच्यावर हल्ला केला. या झटापटीत अर्जुनचा हात दुखावला गेला. त्यानंतर अर्जुनला रुग्णालयात नेऊन त्याची चाचणी करण्यात आली. मात्र सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
‘संदीप और पिंकी फरार’या चित्रपटाचे शुटींग ३ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून यात अर्जुन कपूरसोबत परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.