मुंबई : कोरोना संक्रमनानंतर दोन वर्षांनंतर जीवन पूर्वपदावर येत आहे. दोन वर्षांनंतर सिनेमागृह सुरू झाल्यामुळे सिनेमाप्रेमींचा आनंद द्विगुणीत झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेता सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर तो पाहाण्यासाठी 'भाईजान'च्या चाहत्यांनी सिनेमागृहांमध्ये एकचं गर्दी केली. सलमानला दोन वर्षांनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर पाहाण्यासाठी चाहते उत्सुक होते. पण यावेळी सलमानच्या चाहत्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सलमानचे चाहते वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. अलीकडेच सलमान खानचे चाहते त्याचा सिनेमा पाहताना सिनेमागृहात फटाके वाजवत होते. त्यानंतर आता पुन्हा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमानचे चाहते त्याच्या फोटोवर दुधाचा अभिषेक करत आहेत.
व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून असं न करण्याचा सल्ला चाहत्यांना दिला. सलमान म्हणाला, 'लोकांना पाणी मिळत नाही आणि तुम्ही दूध वाया घालवत आहात. असं करण्यापेक्षा गरीब मुलांना दूध द्या...'
सध्या सलमानची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सलमान खान स्टारर 'अंतिम: द फायनल ट्रुथ' सिनेमा 26 नोव्हेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.