कंगना बॉलिवूड सोडणार ?

आपल्या बिनधास्त आणि बेधडक बोलण्याने सतत चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत ही पुन्हा एकदा ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात बेधडक बोलली. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 14, 2017, 03:15 PM IST
कंगना बॉलिवूड सोडणार ? title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : आपल्या बिनधास्त आणि बेधडक बोलण्याने सतत चर्चेत राहणारी बॉलिवूडची क्वीन कंगना रणावत ही पुन्हा एकदा ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात बेधडक बोलली. आदित्य पांचोली, हृतिक रोशन, सुमन अध्ययन, करण जोहर अशा कुणालाच तिने सोडले नाही. ज्या विषयावर अनेक सेलिब्रिटी बोलणे टाळतात त्या विषयावर ती कोणाचीही पर्वा न करता बोलते. अफेअर, रिलेशनशिपपासून ते नेपोटीझमपर्यंत ती अगदी मोकळेपणाने आपली मते मांडते. त्रास देणाऱ्या समस्यांबद्दल न बोलणे कंगनाला चुकीचे वाटते. किंवा परिणामांच्या भीतीने स्वतःला दाबून ठेवणे हे प्रचंड वाईट आहे. असे कंगनाचे विचार असल्याने ती बेधडक बोलते. 

‘आप की अदालत’ मध्ये तिने केलेल्या विधानांवर अनेक प्रतिक्रीया उमटल्या. अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता या सगळ्यापुढे जात तिने एक धाडसी विधान केले आहे. ती म्हणते, "माझ्या आत्मसन्मानाला ढेच लागणार असेल तर मी बॉलिवूड सोडायला देखील तयार आहे." 

एका मुलाखतीत तिने हे धाडसी विधान केले. मी व्यावसायिक जगातील वस्तू नसून एक जिवंत माणूस आहे. माझे विचार व्यक्त करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. माझे विचार इंडस्ट्रीतील प्रस्थापितांना कदाचित दुखावणारे असतील. पण ते खरे आहेत आणि त्यामुळे माझ्या विचारांमुळे दुखावणाऱ्यांची मला पर्वा नाही. मी वडिलांचे घर सोडून पळून आले तेव्हा मी इथपर्यंत पोहचेन, याची मी कल्पनाही केली नव्हती. मी अनपेक्षित यश मिळवले. अनेक पुरस्कार मिळवले. यश, ग्लॅमर, पैसा सगळे काही मिळवले. आता मला चिंता नाही. यापुढे मला थोडे कमी मिळाले तरी चिंता नाही. मी बॉलिवूडमध्ये थांबले तर हे त्यांच्यासाठी चांगले आहे आणि मी इंडस्ट्री सोडली तर हे माझ्यासाठी चांगले आहे, असे कंगना म्हणते.  

कारण आत्मसन्मान माझ्यासाठी सगळ्यांत मोठा आहे. आधी मी खूप घाबरत काम केले. अपमान सहन केला. पण आता मी यशस्वी आहे आणि यशस्वी असताना बोलणार नाही तर कधी बोलणार? कदाचित मी यासाठीच लोकांच्या लक्षात राहीन. उद्या काम मिळाले नाही तर अधिकाधिक काय होणार? मनालीत चांगले घर बनवले आहे. तिथे जावून राहीन. अभिनयाव्यतिरिक्त अनेक गोष्टी मी करू शकते. मी लेखक, दिग्दर्शक बनू शकते. त्यामुळे मला चिंता नाही. काही दृष्ट लोकांसमोर झुकण्याऐवजी हे आयुष्य मला प्रिय असेल, असे ती म्हणाली.