समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य

Kerala Crime News : केरळमध्ये एका दाम्पत्याने मुलीच्या कृत्यामुळे आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी प्रियकरासोबत पळून गेल्यानंतर हे दाम्पत्य नैराश्यात होते.

आकाश नेटके | Updated: Feb 19, 2024, 08:53 AM IST
समजावून सुद्धा प्रियकरासोबत पळाली मुलगी; नैराश्यात गेलेल्या आई वडिलांनी संपवलं आयुष्य title=

Kerala Crime : आई-बाप मोठ्या कष्टाने आपल्या मुलांना मोठं करत असतात. त्यांना शिकवून एखाद्या गोष्टीसाठी तयार करत असतात. पण काही मुलं ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्या पालकांच्या इच्छांनां तिलांजली देतात. असाच काहीसा प्रकार केरळमध्ये समोर आला आहे. केरळमध्ये एका मुलीने घरच्यांच्याविरोधात जाऊन प्रियकरासोबत पळ काढल्याने आई वडिलांनी मोठं पाऊल उचललं. कॉलेजमध्ये शिकता शिकता तिला तिथल्या एका मुलासोबत प्रेम झाले. घरच्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी त्याला विरोध केला. तो मुलगा मुलीसाठी लायक नाही, असे पालक सांगत होते. शेवटी मुलीने ऐकलं नाही आणि नको ते घडलं.

केरळमध्ये एका जोडप्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या जोडप्याची मुलगी तिच्या प्रियकरासह पळून गेली होती, या कारणामुळे तिच्या आई वडिलांनी स्वतःला संपवलं, असे पोलिसांनी सांगितले. आई-वडिलांचा विरोध पाहून एक दिवस मुलगी प्रियकरासह घरातून पळून गेली. मात्र तिच्या जाण्याने आई-वडील नैराश्यात जगू लागले. त्यांनी उपचारासाठी औषधे देखील घेणे सुरू केले. या औषधांच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला. 

कोल्लम जिल्ह्यातील पावुंबा येथील रहिवासी उन्नीकृष्ण पिल्लई आणि त्यांची पत्नी बिंदू पिल्लई अशी मृतांची नावे आहेत. मुलीच्या प्रेम संबंधांमुळे हे दाम्पत्य मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे त्यांच्या मुलीच्या नातेसंबंधामुळे मानसिकदृष्ट्या खचले होते आणि ती मुलाला सोडून देण्याच्या विनंतीचा विचार न करता पळून गेली होती. दरम्यान, शनिवारी रात्री त्यांनी प्रमाणाबाहेर गोळ्यांचे सेवन केले. त्यानंतर पत्नीचा रात्री मृत्यू झाला, तर रविवारी पहाटे पतीच्या मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या वर्षी केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये आत्महत्येची अशीच एक घटना समोर आली होती. एका 28 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली होती. लग्नासाठी मृत तरुणीच्या प्रियकराने हुंड्याची मागणी केली होती. मृत शहाना ही तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या शस्त्रक्रिया विभागात पीजीची विद्यार्थिनी होती. 5 डिसेंबर 2023 रोजी तो महाविद्यालयाजवळील भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळला. हुंडा म्हणून मुलाने सोने, जमीन आणि बीएमडब्ल्यू कारची मागणी करण्यात आल्याचा आरोप मृत शहानाच्या कुटुंबीयांनी केला होता. शहानाच्या कुटुंबाला तेवढा हुंडा देणे शक्य नव्हते. यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. यामुळे शहानाने आत्महत्या केली.