राज्यात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक बळी, १२७८ रुग्ण वाढले

कोरोना व्हायरसचं महाराष्ट्रात थैमान

Updated: May 10, 2020, 10:22 PM IST
राज्यात एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक बळी, १२७८ रुग्ण वाढले title=

मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. राज्यात एका दिवसात कोरोनाचे ५३ मृत्यू झाले आहेत. एका दिवसात मृत्यू होण्याचं हे सर्वाधिक प्रमाण आहे. तर एका दिवसात कोरोनाचे १,२७८ रुग्ण वाढले आहेत. राज्यात एकूण कोरोनाची संख्या २२,१७१ एवढी झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात आज कोरोनाचे ३९९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनातून पूर्णपणे बरी होणाऱ्यांची संख्या ४,१९९ एवढी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाने सर्वाधिक कहर केला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या १३,७३९ एवढी आहे, तर ५०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

आज राज्यात मृत्यू झालेल्या ५३ जणांपैकी १९ जण मुंबईतील, ५ जण पुण्यातील, जळगाव शहरातील ५ जण, धुळे शहरात २, धुळे ग्रामीण भागात १, पिंपरी-चिंचवडमध्ये १, अहमदनगरमध्ये १, औरंगाबाद शहरात १, नंदुरबारमध्ये १, सोलापूर शहरात १ आणि वसई-विरारमधला १ जण आहे. मालेगाव शहरातील १४ मृत्यू हे २७ एप्रिल हे २७ एप्रिल ते १० मे २०२० या कालावधीतील आहेत, त्यांची नोंद आज घेण्यात आली आहे. याशिवाय मध्यप्रदेशमधील एका व्यक्तीचा आज मुंबईत मृत्यू झाला. 

आज झालेल्या मृत्यूंपैकी ३३ पुरुष तर २० महिला आहेत. मृत्यू झालेल्या ५३ रुग्णांपैकी १९ रुग्ण ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. ३० रुग्ण ४० ते ५९ या वयातले आहेत, तर ४ जण ४० वर्षांखालील आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी १७ जणांच्या आजाराबाबत शासनाला माहिती मिळालेली नाही, तर ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये (७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांसारखे आजार होते.