कोरोनाचा कहर, राज्यात २४ तासात सर्वाधिक मृत्यू

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे.

Updated: Jun 11, 2020, 08:59 PM IST
कोरोनाचा कहर, राज्यात २४ तासात सर्वाधिक मृत्यू title=

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात एका दिवसात सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. मागच्या २४ तासात कोरोनामुळे १५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच कोरोनामुळे एका दिवसात १५० पेक्षा जास्त जणांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णही आढळले आहेत. मागच्या २४ तासामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ३,६०७ने वाढली आहे. 

एकट्या मुंबईमध्येच कोरोनामुळे एका दिवसात ९७ जणांचा मृत्यू झाला, तर १,४१८ रुग्ण वाढले. राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ३,५९० जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ९७,६४८ एवढी आहे. तर राज्यात एकूण ४७,९६८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आजपर्यंत ४६,०७८ रुग्णांना घरी सोडून देण्यात आलं आहे. आजच्या एका दिवसात कोरोनातून बरे झालेल्या १,५६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्याही अचानक वाढली आहे. नागरिकांची रस्त्यावरची गर्दी कमी झाली नाही, तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कालच दिला होता.