कायद्याचा धाक आहे की नाही! कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मारहाण करत लुटलं

कल्याण रेल्वे स्थानकात घडलेल्या घटनेने रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर कल्याण रेल्वे पोलीस आणि आरपीएफने कारवाई करत तीघांना ताब्यात घेतलं आहे, यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. 

Updated: Mar 23, 2023, 05:07 PM IST
कायद्याचा धाक आहे की नाही! कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांना मारहाण करत लुटलं title=

Railway Crime :  कल्याण रेल्वे स्थानकात  (Kalyan Railway Station) घडलेल्या एका घटनेने रेल्वे सुरक्षेचा (Railway Security) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी रेल्वेने एकट्या दुकट्या प्रवास करणाऱ्या महिलांचा विनयभंग करण्याच्या घटना घडत असतात. पण आता तर थेट रेल्वे स्थानकात घुसून प्रवाशांना लुटल्याचा (Passengers Robbed) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घटना घडल्यानंतर जागं झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाई करत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे, यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. तर एक जण फरार आहे.

काय आहे नेमकी घटना?
कल्याण रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर सुखवीर सिंग हा प्रवासी झोपला होता. सुखबीर सिंग हे उत्तर प्रदेश कल्याण रेल्वे स्टेशनवर आले होते. त्यांना सकाळी पुण्याला जायचे असल्याने गाडीची वाट पाहत सुखबीर सिंग पादचारी पुलावरच झोपले. पहाटे चार वाजता चार तरुण पादचारी पुलावर आले. त्यांनी सुखविंदर सिंग यांना लाथेने मारुन उठवलं, त्यांना त्यांना धमकी देत त्यांच्याकडून मोबाईल आणि रोकड हिसकावून घेतली.

त्यानंतर तिथे असलेल्या आणखी दोन प्रवाशांना त्यांनी मारहाण केली आणि त्यांच्याकडूनही मोबाईल आणि रोकड हिसावून तिथून पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. धक्कादायक म्हणजे इतका वेळ प्रकार सुरु असूनही तिथे रेल्वे पोलीस पोहोचले नाहीत. या घटनेनंतर सुखबीर यांनी कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत घडलेल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. पण इतर दोघांनी पोलीस तक्रार केली नाही. सुखबीर सिंग यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी रेल्वे स्थानकावरचे सीसीटीव्ही तपासले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी कल्याण परिसरातून तीन जणांना ताब्यात घेतलं.

ताब्यात घेण्या आलेल्या तरुणांची दीपक मगर आणि कुणाल गोंधळे अशी नावं आहेत. तिसरा आरोपी अल्पवयीन आहे. तर या प्रकरणातील चौथा आरोपी साहिल काकड हा फरार झाला आहे. रेल्वे स्थानकावर पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आता प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय

याआधीही अशा अनेक घटना
कल्याण रेल्वे स्थानकात अशी घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. कल्याण हे जंक्शन असल्याने तिथे प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. लांब पल्ल्च्या एक्स्प्रेसने प्रवास करणारे अनेक प्रवासी रात्रीच्यावेळी रेल्वे तिकीट खिडकी जवळच्या मोकळ्या जागेत आपल्या सामानासह झोपतात. याचीच संधी साधत चोरटे एकटेदुकटे प्रवासी हेरून त्यांच्याजवळील सामान लंपास करतात. 

काही महिन्यांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकातच पहाटेच्या सुमारस घरी परतणाऱ्या एका प्रवाशा लुटण्यात आल्याचा प्रकार घडला होता. हा प्रवासी कल्याण रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 इथून पायी चालत होता.  त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या एका चोरट्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावला आणि तिथून पळ काढला.