आता ऍम्ब्युलन्स म्हणून रुग्णांच्या मदतीला धावणार टॅक्सी

ऍम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे पालिकेचा महत्त्वाचा निर्णय   

Updated: Jul 8, 2020, 02:41 PM IST
आता ऍम्ब्युलन्स म्हणून रुग्णांच्या मदतीला धावणार टॅक्सी title=
संग्रहित छायाचित्र

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात coronavirus कोरोना व्हायरसच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अत्यवस्थ रूग्णांसोबतच कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या. 

सातत्यानं येणाऱ्या या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून या रुग्णवाहिकाचे वॉररूममधून नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णवाहिकांसमवेत आता काळ्या पिवळ्या टॅक्सीसह, बसेसदेखील नव्याने भाडे करारावर घेण्यात आल्या असून या गाड्यांचा वापरदेखील संशयित रुग्णांना विलगीकरणात नेण्यासाठी केला जाणार आहे. 

रुग्णांना नेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या टॅक्सीमध्ये खास पार्टिशन करण्यात आले आहेत. नागरिकांनी वॉररूममधील दूरध्वनीवर संपर्क साधल्यानंतर संबंधितांना तत्काळ रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

 

कोरोना रुग्णांमध्ये होतेय झपाट्यानं वाढ 

कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोना रुग्णांची अतिशय झपाट्यानं वाढ होत आहे.  सोमवारी येथे 413 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ज्यानंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांचा आकडा 9499 वर पोहचला आहे. ज्यामध्ये सध्या 5323 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून 4032 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.