पाकिस्तानचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण...

चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी औरंगाबादेत शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली

Updated: Apr 20, 2019, 10:26 AM IST
पाकिस्तानचा हवाला देत उद्धव ठाकरेंनी दिलं भाजपसोबतच्या 'युती'चं कारण... title=

औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अखेर भाजपसोबत पुन्हा एकदा 'युती' करण्याचं कारण सांगून टाकलंय. यासाठी त्यांनी पाकिस्तानचा हवालाही दिलाय. 'शिवसेनेनं भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा एकदा नव्यानं युती केली कारण आपल्या पक्षाला एक असा पंतप्रधान हवाय ज्याच्याकडे पाकिस्तानवर हल्ला करण्याची हिंमत असेल' असं यावेळी उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.  

आपण यापुढे कधीच भाजपासोबत हातमिळवणी करणार नाही, या आपल्याच घोषणेवर पलटी मारण्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटलं 'पाकिस्तानात घुसून हल्ला करणारा पंतप्रधान आम्हाला हवाय. त्यामुळेच आम्ही पुन्हा एकदा युती केलीय. मी मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या कल्याणासाठी भाजपासोबत हातमिळवणी केलीय' असंही त्यांनी यावेळी म्हटलं. 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं संविधानाचं कलम ३७० काँग्रेसला हटवायचं नाही. परंतु, जम्मू काश्मीरमध्ये इतर भारतात जे कायदे लागू आहेत तेच कायदे जम्मू-काश्मीरमध्येही लागू व्हावेत ही शिवसेनेची मागणी आहे, असंही त्यांनी म्हटलंय. 

'एमआयएम'वर टीका

चंद्रकांत खैरेंच्या प्रचारासाठी औरंगाबादेत शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची सभा झाली. यावेळी उद्धव ठाकरेंनी 'एमआयएम'वर कडाडून टीका केली. आपण मुस्लिमांना शत्रू मानत नसल्याचंही त्यांनी अधोरेखीत केलं. 

राष्ट्रवादीचे जयदत्त क्षीरसागर सेनेच्या मंचावर

व्यासपीठावर शिवसेनेच्या नेत्यांसोबत बीडचे राष्ट्रवादीचे नाराज नेते जयदत्त क्षीरसागरही होते. यावेळी बोलताना 'जयदत्त तुम्ही म्हणाल आता पाहुणा म्हणून आलो पण आता पाहुणे राहू नका, घरचे व्हा' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तर निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळ मागे पडल्याचंही त्यांनी मान्य केलं. 'दुष्काळात मदतीचा हाथ द्यायला पुढं या आणि तातडीनं काम सुरु करा' असा आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिला. या कामासाठी त्यांनी भाजपाकडेही मदतीची मागणी केलीय.