राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...'

LokSabha: राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षातील लोकांना मान्य असल्याचा खुलासा राहुल शेवाळे यांनी केला आहे. मनसेचं आम्ही महायुतीमध्ये स्वागतच करतोय असंही ते म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 28, 2024, 01:05 PM IST
राज ठाकरे महायुतीत कधी सहभागी होणार? राहुल शेवाळेंनी अखेर केला खुलासा, 'शिंदे, आणि फडणवीसांनी...' title=

LokSabha: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्रच युतीची घोषणा करतील अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिलं आहे. इतकंच नाही तर राज ठाकरेंचं नेतृत्व तिन्ही पक्षांना मान्य असल्याचंही मोठं विधान त्यांनी केलं आहे. मनसे आणि शिवसेनेचे पदाधिकारी आज दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवजयंतीसाठी एकत्र आले होते. राहुल शेवाळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

"मनसेचा लवकरच महायुतीत सहभाग होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यासंदर्भातील निर्णयाची घोषणा करतील. पण आम्ही यापूर्वीच शिवसेनेच्या वतीने आमची भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही मनसेचं स्वागत करतो. कारण मनसे हा शिवसेनेच्या विचारसरणीचा पक्ष आहे. हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचे आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारा आहे," असं राहुल शेवाळे म्हणाले आहेत.

"राज ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही याआधीही काम केलं आहे. त्यामुळे मनसे महायुतीत आल्यास आमची ताकद वाढेल," असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला आहे. मनसे आणि शिवसेनेची विचारधारा एकच आहे. हिंदुत्व आणि विकासासाठी आम्ही काम करत आहोत असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महायुतीमधील सर्व पक्षांची मदत होणार आहे असं त्यानी सांगितलं. 

लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊन 10 दिवस झाले असले तरी महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. भाजपा-शिंदे गट आणि अजित पवार यांच्यात अजूनही पूर्णपणे सहमती झालेली नसून जागांवरुन एकमत झालं नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यात मनसे सहभागी होत असल्याने त्यांना नेमक्या किती आणि कुठल्या जागा द्यायचा याबद्दलही निर्णय झालेला नाही. आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी बुधवारी दिली. 

शिवतीर्थवर पार पडलेल्या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी सांगितलं की, "राजकारणात संयम आणि धैर्य असतो तोच पुढे जातो. थोडा संयम ठेवल्यानंतर सर्व प्रश्नांची उतरं मिळतील". मनसे शिवसेनेत सहभागी होणार असून, राज ठाकरे नेतृत्व करणार असल्याच्या प्रस्तावाचीही चर्चा सुरु आहे. त्यावर बाळा नांदगावकर म्हणाले की, "माध्यमांमध्ये हे वृत्त आलं. आम्हाला त्याची कल्पना नाही. यासंदर्भात चर्चा झाली असेल तर संबंधित पक्षप्रमुखांना याची माहिती असावी. आमच्याशी यासंदर्भात चर्चा झालेली नाही". 

"आम्ही 3 जागा मागितल्या होत्या. 3 जागांवर चर्चा सुरु होती. आता 2 जागांवर चर्चा सुरु आहे. यावर राज ठाकरे आणि महायुती निर्णय घेतील," अशी माहिती बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. दरम्यान हे 2 मतदारसंघ कोणते आहेत याची माहिती देण्यास बाळा नांदगावकर यांनी नकार दिला.