LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंच्या आरोपांना उत्तर दिलं. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. ते त्यांना जरांगे पाटील यांना काहीतरी सांगत असतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
"आमचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल. त्यानंतर तिन्ही पक्षांमधील जागावाटप ठरवू. भाजपाच्या वाट्याला ज्या जागा आल्या आहेत आणि अपेक्षित आहेत याची मांडणी आम्ही आधीच केंद्रीय निवडणूक समितीकडे केली आहे. सुटलेल्या जागांसंदर्भात निवडणूक समिती निर्णय घेईल त्यानंतर घोषणा केली जाईल. तीन पक्षातील अंतिम जागावाटप फक्त शिल्लक आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
कोल्हापुरात शाहू महाराजांना उमेदवारी दिली असून, ती बिनविरोधी व्हावी असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उमेदवारी दिली तर साताऱ्यात बिनविरोध करणार का? अशी विचारणा केली. "साताऱ्यात उदयनराजेंना महायुतीने जागा दिली तर बिनविरोध करणार आहेत का? त्यांचा सन्मान राखला जाणार का? हे राजकारण आहे. या घराण्याने याआधीही निवडणुका लढवल्या आहेत," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उदयनराजेंची आज अमित शाहांशी भेट होईल. यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी आपल्याला तडीपार करण्याचा कट असल्याचा आरोप केला आहे. त्यावर ते म्हणाले की, "आमचे खूप हिंतचिंतक आहेत, जरांगे पाटील यांना जाऊन ते काहीतरी सांगत असतात आणि त्यावर ते बोलतात. त्यांना तडीपार करण्याचा काही प्रश्न नाही. अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुवून घेतात. ते त्यांना जाऊन सांगत असतात".
"मुख्यमंत्र्यांनी आणि मी आधीच सांगितलं आहे की, ज्या केसेस दाखल झाल्या आहेत त्यातील आंदोलनाच्या मागे घेतल्या जाणार आहेत. जाळपोळ, पोलिसांवर हल्ला प्रकरणातील केसेस मागे घेऊ शकत नाही. इतर केसेस मागे घेत असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. 24 जिल्ह्यातील 492 केसेस आहेत. त्यातील दोन जिल्ह्यात जास्त आहेत. त्याची छाननी सुरु असून जवळपास 172 केस मागे घेण्याबाबत शिफारसही झाली आहे. आचारसंहित लागली असून आम्ही छाननी पूर्ण करु आणि संपल्यानंतर मागे घेऊ असं सांगितलं आहे. विनाकारण संभ्रम पसरवला जात आहे. सगेसोयरे आणि केसेससंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
राज ठाकरेंचा पक्ष शिवसेनेत जाणार असल्याचा प्रश्न ऐकताच ते संतापले. "कोणता पक्ष कोणाकडे जात नसतो. मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही. त्यामुळे मला याचं उत्तर विचारु नका" असं ते म्हणाले. महायुतीत त्यांना घेण्यासंबंधी चर्चा सुरु आहे असं त्यांनी सांगितलं.
"मी उद्धव ठाकरेना टोमणेबहाद्दर अशी उपमा दिली आहे. आता ती उपमा कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करत आहेत. ते टोमणे मारत असतात आणि काहीतरी बोलत असतात. त्यांनी विकासावर एक वाक्य बोलावं. ही निवडणूक सर्वसामान्याच्या जीवनात परिवर्तन बदल करुन देणारी आहे. ते सांगू शकतील असा एकही प्रकल्प नाही. त्यामुळे ते विकासावर बोलूच शकत नाही. मनोरंजन करणं आणि हेडलाईन मिळवणे याशिवाय त्यांच्याकडे काही नाही," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.