मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का?; संजय राऊत संतापले; EC ला म्हणाले 'उद्या संध्याकाळनंतर तुम्हाला...'

Sanjay Raut on PM Narendra Modi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jun 3, 2024, 06:07 PM IST
मोदी ध्यानाला बसले तो प्रचार नव्हता का?; संजय राऊत संतापले; EC ला म्हणाले 'उद्या संध्याकाळनंतर तुम्हाला...' title=

Sanjay Raut on PM Narendra Modi: केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. याप्रकरणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत राज्य निवडणूक आयोगाला कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यावर व्यक्त होताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? अशी विचारणा त्यांनी केली आहे. 

"केंद्रीय निवडणूक आयोग हा भाजपाची एक शाखा आहे. निवडणूक आयोग स्वतंत्र, निष्पक्ष नाही. या सगळ्याचा जाब त्यांना उद्या संध्याकाळनंतर द्यावा लागणार आहे. नरेंद्र मोदी परवा ध्यान करायला बसले तो प्रचार नव्हता का? सर्व वृत्तवाहिन्यांच्या 10 कॅमेरे लावून ध्यान करायला बसले. सगळ्या माध्यमांकडून त्याचं 24 तास चित्रीकरण करण्यात आलं. तीदेखील एक मूक पत्रकार परिषदच होती. त्यावर निवडणूक आयोगाचे डोळे उघडले नाहीत कारण बहुदा निवडणूक आयोगही ध्यानाला बसला होता असंच म्हणावं लागेल. आमच्याकडे 24 तास आहेत. उद्या दुपारनंतर पाहू कोण कोणावर कारवाई करतं आहे?," असा इशाराचा संजय राऊतांनी दिला आहे. 

आम्ही 17 पत्रं पाठवली असून त्यापैकी एकालाही उत्तर दिलं नसल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला. ते म्हणाले की, "आमच्या पक्ष कार्यालयाकडून आतापर्यंत 17 पत्रं आयोगाला पाठवली. त्याची दखल अजून आयोगाने घेतली नाही. महाराष्ट्रात यंत्रणेचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर सुरु आहे, पैशांचं वाटप सुरु आहे. मुख्यमंत्री, भाजपाचे नेते यांच्यासंदर्भातल्या या तक्रारी आहेत. याची दखल घेण्यात आलेली नाही. मात्र उद्धव ठाकरेंनी जी पत्रकार परिषद घेतली, त्यासंदर्भात भाजपाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि केंद्रीय निवडणूक आयोग किती तत्परतेने कारवाईचे आदेश देतो, आम्ही या कारवाईचं स्वागत करतो".

ज्या जिल्ह्यात भाजपला हरण्याची भीती आहे, त्याठिकाणी गृह मंत्रालयाकडून फोन गेले आहेत, ही माझी पक्की माहिती आहे असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केला आहे. ज्या 150 मतदारसंघात धमक्या दिल्या जात आहेत त्यातले 12 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत असंही ते म्हणाले आहेत. 

उद्या भाजपाचा पराभव होणार आहे. लाडू वाटा, जिलबी वाटा, बासुंदी वाटा, फाफडा वाटा, पण तुमचा पराभव निश्चित आहे. लोक आनंद उत्सव साजरा करतील. उद्या संध्याकाळी 4 नंतर माजी पंतप्रधान होतील आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल, त्यानंतर 24 तासांत आमचा पंतप्रधान जाहीर होईल असाही दावा संजय राऊत यांनी केला.