सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांमुळे सप्तशृंगी गडावर मोठं संकट; गावावर दरड कोसळण्याचा धोका

Saptshringi Gad : रायगडमध्ये दरड कोसळ्याने आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.अशातच राज्यतल्या दरडप्रवण क्षेत्रांबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही दरड कोसळ्याची दाट शक्यता आहे.

आकाश नेटके | Updated: Jul 22, 2023, 09:58 AM IST
सुरक्षेसाठी लावलेल्या जाळ्यांमुळे सप्तशृंगी गडावर मोठं संकट; गावावर दरड कोसळण्याचा धोका title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : रायगडच्या इरसालवाडीमध्ये (irshalwadi landslide) दरड कोसळून आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण तीन तीन दिवसानंतरही बेपत्ता आहेत. डोंगराचा काही भाग इरसालवाडीवर कोसळ्याने बरीच घरे दरडीखाली दबली गेली. या भीषण दुर्घटनेनंतर राज्यातील अनेक दरडप्रवण क्षेत्रांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. अशातच नाशिकच्या (Nashik News) सप्तशृंगी गडावरही (Saptshringi gad) दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या संरक्षित जाळ्यांमुळे हा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे स्थानिकांकडून प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

सप्तशृंगी गडावरील दरड कोसळू नये म्हणून लावण्यात आलेल्या संरक्षित जाळ्यांमुळे दरड कोसळण्याचा धोका अधिक वाढला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सप्तशृंगी गडावरील उंच पहाडी पाषाणातील कपारींमध्ये करण्यात आलेल्या ड्रिलिंगमुळे डोंगराचा भाग कमकुवत झाला आहे. डोंगरावर अनेक ठिकाणी तडे गेल्याने दरड कोसळण्याच्या धोका अधिक वाढला आहे. याचे तातडीने शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा पावसाळ्यात माळीन सारखी दुर्घटना वनी गडावर घडू शकते.

माळीन व इरसालवाडीची पुनरावृत्ती सप्तशृंगी गडावरही होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात वणी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं आहे. वनी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पात्र लिहिले असून येथे योग्य त्या उपाय योजना पूर्ण करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे. "सप्तश्रृंगी गडावर जाणाऱ्या पायऱ्यांच्या बाजूला माती साचल्यामुळे दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भींत उभारण्याची गरज आहे," असे पंचायतीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सप्तश्रृंगी गडावरही अशी घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यासंबंधी येथील ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. 

सप्तशृंगी गडावर दरड कोसळून 2 भाविक जखमी

गेल्या आठवड्यात सप्तशृंगी गडावर दरड कोसळल्याची मोठी घटना समोर आली होती. सप्तश्रृंगी गडासमोरील मार्कंडेय पर्वतावर ही दरड कोसळली होती. या दुर्घटनेत दोन भाविक जखमी झाले. मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावस्यानिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ही दरड कोसळल्याची घटना घडली. यामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाले होते. या जखमींना उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान गेल्या आठवड्यातच सप्तश्रृंगी गडावरील घाटात बस कोसळून एका प्रवासी ठार तर, उर्वरित प्रवासी जखमी झाले होते. घाटातही दरड कोसळण्याच्या घटना दर पावसाळ्यात घडत असतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करायच्या त्यावर गावकऱ्यांनी चर्चा करत अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्यास सांगितले आहे.