प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर, राजकारणात जाण्याचा मार्ग निश्चित

अखेर राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंडर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.  

Updated: Sep 10, 2019, 09:45 AM IST
प्रदीप शर्मा यांचा राजीनामा मंजूर, राजकारणात जाण्याचा मार्ग निश्चित title=
संग्रहित छाया

ठाणे : अखेर राज्य सरकारच्या गृहखात्याने एन्काऊंडर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. प्रदीप शर्मा हे वरिष्ठ पोलीस नीरिक्षक होते. प्रदीप शर्मा यांनी जुलै महिन्यातच तडकाफडकी राजीनामा दिला होता. त्यानंतर ते निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. शर्मा यांचा राजीनामा मंजूर झाल्याने त्यांचा राजकारणात जाण्याचा मार्ग जवळपास निश्चित मानला जात आहे. आगामी विधानसभेच्या निवणूकीत ते शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. 

एन्काऊंडर स्पेशालिस्ट म्हणजेच जवळपास १०० हुन अधिक एन्काऊंडर करणारा अधिकारी प्रदीप शर्मा यांनी स्वेचनिवृत्ती अर्ज दिल्यानंतर आता ते पुढे राजकारणात जाणार का? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगली होती. आता तर त्यांचा राजीनामा स्विकारण्यात आल्याने ते राजकारणात जाणार हे निश्चित मानले जात आहे. शिवसेनेकडून त्यांना नालासोपारातून आमदारकीसाठी उतरवण्याची तयारीही झाली, असल्याचे सांगण्यात येत आहे. 

प्रदीप शर्मा पुढे राजकारणात उतरतील अशी चर्चा गेली दोन वर्षांपासून रंगत होती. पहिल्यांदा त्यांच्या राहत्या परिसर म्हणजेच अंधेरी परिसरातून त्यांनी विधानसभेची तयारी सुरु केली. त्यासाठी त्यांनी या परिसरात अनेक सामाजिक कार्यक्रम ही राबवले होते. एन्काऊंडर स्पेसिलिस्ट म्ह्णून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांनी ४ जुलै रोजी पोलीस विभागाकडे स्वेच्छानिवृत्ती अर्ज सुपूर्त केल्यानंतर सर्वाना धक्काच बसला होता. परंतु त्यानंतर प्रदीप शर्मा काय करणार या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाण्याचे  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची गुप्त बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. शिंदे हे शर्मा याना शिवसेनेत येण्यासाठी गळ घालत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शर्मा हे शिवसेनेत जाणार, अशी शक्यता आहे.