सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात गुन्हेगारांना पोलिसांचा धा उरलेला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आलं आहे. पोलिसांनी वारंवार इशारा देऊनही पुण्यात गुंडांचा हैदोस पाहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी कहर केल्याचे समोर आलं आहे. गाडी पार्क करण्याच्या वादातून झालेल्या भांडणात एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्ला करणाऱ्या आरोपींनी एका महिलेलासुद्धा पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
पुण्यातील खराडी परिसरात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. यावेळी टोळक्याकडून गाड्यांच्या जाळपोळीसह महिलेला देखील पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. गाडी पार्क करण्याच्या किरकोळ वादातून तरुणाला मारहाण करत त्याची चारचाकी गाडी पेटवण्यात आली. त्याचवेळी घडलेला प्रकार बघण्यासाठी आलेल्या एका महिलेवर देखील पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला.
फिर्यादी महेश राजे हे पुण्यातील वडगाव शेरी परिसरात राहायला असून त्यांचा चारचाकी गाडी पार्किंग करण्यावरुन या टोळक्यासोबत वाद झाला होता. त्यानंतर स्कूटीवरुन आलेल्या धीरज सपाटे ,आकाश गायकवाड ,सुरज बोरुडे विशाल ससाने यांच्यासह दहा अज्ञात आरोपीनी जाळपोळ करण्यास सुरुवात केली. या प्रकरणी चंदनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.
पुण्यात सर्व हुक्का पार्लर बंद
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदा सुवव्यवस्थेबाबत माहिती दिली. वाघोलीतल्या तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी भाष्य केलं. या संपूर्ण प्रकरणाची दखल वरिष्ठ पोलिसांकडून घेण्यात आली आहे. एक पोलीस अधिक्षक दर्जाचे अधिकारी या संपूर्ण घटनेचा तपास करतील. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्यात असलेल्या कर्मचाऱ्याचे निलंबन याआधी करण्यात आले आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या 50 सोशल अकाउंटवर कारवाई करण्यात आली आहे. यासोबत पुण्यातील बार, पब्स, रेस्टॉरंट यांना नोटीस पाठवण्यात येणार आहे. कलम 144 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात येणार आहे. पुण्यातील बार, पब्स जर रात्री 1.30 नंतर सुरू ठेवल्यास कठोर कारवाई होणार आहे. तसेच पब्स, रेस्टॉरंट मध्ये हुक्का सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.