देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात

Satara News : साताऱ्यात भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत पावलेले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते. त्याचवेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. 

आकाश नेटके | Updated: Aug 10, 2023, 10:03 AM IST
देवदर्शनासाठी निघालेल्या चौघांचा दुर्दैवी मृत्यू; साताऱ्यात भीषण अपघात title=

Satara News : साताऱ्यात (Satara Accident) भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घातल्याने चौघांचा मृत्यू झाला आहे. तर चारजण गंभीर जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Satara Police) घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरु केले होते. मात्र गाडीतील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी आणि पोलिसांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

 सातारा जिल्ह्यातील सूर्याचीवाडी गावाजवळ ही धक्कादायक घटना घडली आहे.  मायणी-दहिवडी मार्गावरील धोंडेवाडी ते सूर्याचीवाडी दरम्यान मारुती ओमनी गाडीचा अपघात होऊन तीन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. ओमनी गाडी झाडावर आदळल्याने तीन जण जागीच ठार झाले. तर अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यातील एकाच रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गाडीतील सर्व प्रवासी कुरोली व बनपुरी येथील रहिवासी होते. बाळू मामाच्या मेंढराचे देवस्थान असलेल्या लाकरेवाडी येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला आहे.

साताऱ्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडूरंग देशमुख यांच्या मारुती ओमनी गाडीतून कुरोली व बनपुरी येथील प्रवासी सांगली जिल्ह्यातील लोकरेवाडी येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कातरखटाव ते मायणी दरम्यान असलेल्या सूर्याचीवाडी गावाच्या हद्दीत चालकाचा ताबा सुटल्याने गाडी झाडावर जाऊन आदळली. या घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तात्काळ स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र जखमींपैकी आणखी एकाचा मृत्यू होऊन मृतांची संख्या चार पोहोचली आहे. पोलीस उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.

भंडाऱ्यात ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने बसला दिली धडक

पवनीकडून भंडाराकडे येत असलेल्या ट्रकने समोरून येत असलेल्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात जोरदार धडक दिल्याची घटना अड्याळ पवनी मार्गावरील नेरला उपसा जवळ घडली आहे. या अपघातामध्ये ट्रकचालक हा गंभीररित्या जखमी झाला असून बसचालक किरकोळ जखमी झाला आहे. या घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार प्रशांत मिसाळे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळ गाठत जखमींना प्राथमिक उपचारार्थ अड्याळ येथील रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र ट्रकचालक गंभीर जखमी असल्या कारणाने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान बस क्र.MH 40 CM 1685 ही भंडारा वरून 30 प्रवासी घेऊन पवनी येथे जात असतांना पवनीकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात बसला धडक दिली. बसचालकाने समयसुचकता दाखवत बसरोडच्या कडेला घेऊन जात थांबवली त्यामुळे बस मधील प्रवासी सुखरूप आहेत.