मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई, विरार आणि नालासोपाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्कार होण्याच्या प्रकारात वाढ होत आहे. यात एका सिरीयल रेपिस्टचा समावेश असल्याचे पुढे आलेय. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जनजागृतीसाठी बैठकाही घेण्यात आल्यात. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेली व्यक्ती हिच असल्याचे पीडित मुलींनी पोलिसांनी सांगितलेय. त्यानंतर त्याचे छायाचित्र जारी करण्यात आलेय. तसेच त्याच्यावर बक्षिसही लावण्यात आलेय.
मुंबई जवळील नालासोपाऱ्यात चार दिवसांत दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याने संताप व्यक्त होत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील अल्पवयीन मुलींना हा सिरीयल रेपिस्ट आपली शिकार बनवत आहे. हा युवक नालासोपाऱ्यात दाखल झालाय. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हा रेपिस्ट अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवतो. त्यांना हेरतो आणि त्यांना घरातील समस्या सांगतो. त्यानंतर तुझ्या वडिलांनी मला तुला न्यायला पाठवले आहे, तुझ्या वडिलांचे पार्सल आले आहे, अशा खोट्या बाता मारत अल्पवयीन मुलींना अज्ञातस्थळी नेतो, जुन्या ईमारतीच्या छतावर, किंवा निर्जन ठिकाणी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करुन फरार होतो.
या तरुणाविरोधात नालासोपाऱ्यातील एका पोलीस ठाण्यात बलात्कार आणि विनयभंग असे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर याठिकाणी या सिरीयल रेपिस्टवर आत्तापर्यंत बारा गुन्हे दाखल आहेत.
पालघर पोलिसांनी नागरिकांना सिरीयल रेपिस्टबाबत सावध राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या नराधमाचे फोटो प्रसिद्ध करून नागरिकांनी, पालकांनी, शिक्षकांनी त्यांच्या मुलींना या नराधमाबाबत जागरूक करण्याचे आवाहन केले आहे.