श्रीगोंदा नगर परिषदेत भाजपला बहुमत पण...

श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले आहे.

Updated: Jan 28, 2019, 12:36 PM IST
श्रीगोंदा नगर परिषदेत भाजपला बहुमत पण... title=

अहमदनगर - श्रीगोंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला केवळ ८ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने या नगर परिषदेत बहुमत मिळवले असले, तरी नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार शुभांगी पोटे या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी सुरुवातीपासूनच मतमोजणीत आघाडी घेतली होती. ती शेवटपर्यंत कायम राहिली. नगर परिषदेत भाजपला बहुमत मिळाले, तरी नगराध्यक्षपदावर भाजपला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे भाजपच्या गोटात 'कभी खुशीं, कभी गम' असेच चित्र असल्याचे पाहायला मिळते आहे.

श्रीगोंद्यातील निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. त्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडे पक्षाने सूत्रे दिली होती. या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात प्रचारही करण्यात आला होता. पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आणण्यात भाजपला यश आले नाही. भाजपच्या उमेदवार सुनिता शिंदे यांचा निवडणुकीत पराभव झाला. 

श्रीगोंदा नगर परिषदेच्या एकूण १९ जागांसाठी ७१ उमेदवार रिंगणात होते. या नगर परिषदेच्या निवडणुकीत एकूण ८४ टक्के मतदान झाले होते.