मुंबई : मुंबईसाठी आताची महत्त्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
7 मार्चला मुंबई महानगरपालिकेची मुदत संपत आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे की कोणत्याही आस्थानिक संस्थेला मुदतवाढ देता येत नाही. मुदत संपल्यानंतर लगेच निवडणूक घेणं शक्य होणार नाही.
सात मार्चला मुंबई महापालिकेची मुदत संपत असून निवडणूक एप्रिल अखेर किंवा मेमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ७ मार्चनंतर मुंबई महापालिकेवर प्रशासन नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
प्रशासक नेमण्याचा इतर महानगरपालिका किंवा नगरपालिकांसाठीच्या कायद्यात तरतूद आहे. मुंबई महापालिकेच्या कायद्यात तशी तरतूद नाही. त्यासाठी आज मंत्रीमंडळाने निर्णय घेतलेला आहे कि कायद्या बदल करुन ७ मार्चनंतर मुंबई महानगर पालिकेवर प्रशासक नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.
त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल, राज्यपालांना हा निर्णय कळवण्यात येईल. राज्यपालांची मान्यता मिळाल्यानंतर याबाबत अध्यादेश काढण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगच्या शिफारसीनुसार हा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.