नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.   

Updated: Sep 24, 2020, 02:42 PM IST
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोनाची लागण  title=

मुंबई : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात देशात 86 हजार 508 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 1129 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्याचप्रमाणे संपर्कात आलेल्या लोकांना देखील स्वतःची कोरोना चाचणी करण्यासाठी आवाहन केले आहे. 

ट्विट करत ते म्हणाले की, 'काल मी माझी कोविड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशिर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोविड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...'

दरम्यान, देशात आतापर्यंत 57 लाख 32 हजार 519 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 46 लाख 74 हजार 988 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सध्या भारतात 9 लाख 66 हजार 382 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.