Maharashtra Politics : लोकसभा निवडणूक 2024 मध्ये राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election 2024) तोंडावर मोठा निर्णय घेतला आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकता महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यानंतर मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे जिल्ह्यातील सर्वच विधानसभेच्या जागा लढणार असल्याचं मनसेने निश्चित केलं आहे. इथल्या सर्वच जागांचा आढावा घेण्यासंदर्भात राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.
दरम्यान, मनसेने केलेल्या सर्वेक्षणातून महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्या विरोधात नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे चारही जिल्ह्यांकडे मनसेने विशेष लक्ष दिलं आहे. 225 जागेवर विधानसभा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. आजच्या बैठकीत चारही जिल्ह्यांच्या पदाधिकाऱ्यांना कोणतीही युती नसल्याचे सांगत कामाला लागण्याची दिली सूचना देण्यात आल्या आहेत. मनसेच्या बैठकीत ठाणे, नाशिक, मुबंई इथल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला.
राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यंनी चार ऑगस्टपासून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे राज ठाकरे यांनी सर्व जिल्ह्यांचा आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात सोलापूर आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांवर फोकस करण्यात आला. सोलापूर, धाराशिव, नांदेड ,लातूर, हिंगोली, परभणी, बीड जालना ,संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये राज ठाकरे यांनी भेट देत पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
मनसे किती जागा लढवणार?
राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. विधानसभेच्या 225 जागा मनसे लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं. निवडून येण्याची ज्याची क्षमता असेल त्यालाच तिकीट दिले जाईल असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. तिकीट मिळाले की पैसे काढायला मोकळा अशा प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट देणार नाही असेही राज यांनी सांगितलं होतं.
मनसेचे इतर सांभाव्य उमेदवार
कोकण, ठाणे पुणे तसेच कोकणातील खेड-दापोली-मंडणगड विधानसभा जागेसाठी वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शैलेश बिडवे यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. नवी मुंबई विधानसभा मतदारसंघातून गजानन काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.