मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर झालेला बलात्कार आणि मृत्यू यामुळे राज्य सरकारवर टीका होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे परप्रांतीयांची नोंद ठेवा, असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. 'राज्यात बाहेरुन कोण येतो? कुठून येतो? कुठे जातो?' याची नोंद ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना आदेश दिले आहेत. राज्यातील महिला अत्याचारांवर बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेत हे आदेश दिलेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशानंतर भाजपने टीका केली आहे. भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. महिला शोषणाचा आरोप असलेले धनंजय मुंडे, संजय राठोड, मेहबुब शेख हे परप्रांतीय आहेत?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. परप्रांतियांची नोंद ठेवा' असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे यांनी दिले आहेत. पण बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्याबद्दल आश्चर्यकारक मौन बाळगलंय. बलात्कारी दरिंद्यांची कुठली जात, धर्म आणि भाषा असते का?, असा प्रश्न भातळखकर यांनी ट्विटरवरुन विचारला आहे.
गुन्हेगारांच्या कॉलरला हात घालता येत नाही, महिलांना सुरक्षा देता येत नाही, केवळ सामाजिक तेढ निर्माण करून मुख्यमंत्री परप्रांतीयांच्या डोक्यावर खापर फोडण्याचा दुर्दैवी प्रयत्न करीत आहेत, अशी टीकाही भातखळकर यांनी केली आहे.
राज्याला हादरवून टाकणाऱ्या मुंबईतील साकिनाका बलात्कार प्रकरणातील आरोपींने गुन्हा कबुल केला आहे. या प्रकरणी महिन्याभरात आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी महिती मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे. या आरोपीवर अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.