Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार? राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा थोड्याचवेळात शिवतीर्थावर सुरु होणार आहे. राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कडे रवाना झाले आहेत. गुढीपाडवा मेळव्यात राज ठाकरे कुणाचा समाचार घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

Updated: Mar 22, 2023, 06:02 PM IST
Raj Thackeray : राज ठाकरेंची तोफ आज शिवतीर्थावर धडाडणार? राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवाजी पार्कात दाखल title=

Raj Thackeray Rally : दरवर्षीप्रमाणं यंदाही गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ शिवतीर्थावर (Shivtirtha) धडाडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवाजी पार्कवरील (Shivai Park) गुढीपाडवा (GudhiPadva) मेळाव्याला काय बोलणार याची उत्सुकता आहे. राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय. नुकत्याच ठाण्यात झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळाव्यात सर्व विषयांची चिरफाड करणार असे वक्तव्य केलं होतं. शिवसेनेची झालेली दोन शकलं आणि प्रामुख्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. 

राज्यभरातून कार्यकर्ते शिवतीर्थावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थावरील मेळाव्यासाठी राज्यभरातून मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत. बसेस आणि खासगी वाहनांमधून कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. या सभेला पुण्यातही हजारोंच्या संख्येने मनसैनिक आता रवाना होत आहेत... अनेक बसेस आणि चारचाकी वाहनांमधून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. पालघर जिल्ह्यातूनही शेकडो मनसे कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. पालघर जिल्ह्यातून 100 बसेस आणि 800 खासगी वाहनांमधून मनसैनिक मुंबईकडे निघाले आहेत. मुंबई लोकलमधूनही कार्यकर्ते दादरमध्ये दाखल झालेत. कर्जत, बदलापूर, अंबरनाथ,  कल्याणमधले कार्यकर्ते लोकल ट्रेनमधून सभेसाठी पोहोचलेत. 

वसंत मोरे सभेसाठी मुंबईत
पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे हदेखील आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत दाखल झाले आहेत. राज ठाकरेंची सभा असली की वसंत मोरेंच्या उपस्थितीकडे नेहमीच लक्ष असतं. मनसेच्या वर्धापन दिनालाही मोरे उपस्थित राहणार की नाही अशी अटकळ होती. मात्र ते उपस्थित होते. आता गुढीपाडवा मेळाव्यासाठीही मोरे उपस्थित झाले आहेत.

राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण? 
ठाकरे विचार जपण्यासाठी शिवतीर्थावर या, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. याचाच अर्थ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच राज ठाकरेंचं पहिलं टार्गेट असतील, असं मानलं जातंय. महाराष्ट्रातल्या शिंदे विरुद्ध ठाकरे (Shinde vs Thackeray) सत्तासंघर्षाचा ते समाचार घेतील. मशिदीवरच्या भोंग्याचा मुद्दा काढून ते पुन्हा एकदा कट्टर हिंदुत्ववादी भूमिका मांडतील, अशी अपेक्षा आहे. संभाजीनगर नामांतरला एमआयएमचा विरोध, लव्ह जिहादसारख्या मुद्यांवरही ते परखड भाष्य करण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी आतापर्यंत अनेकवेळा आपली राजकीय दिशा बदलली आहे. महाराष्ट्रातल्या ताज्या सत्तासंघर्षानंतर आपली नेमकी दिशा त्यांनी अजून स्पष्ट केलेली नाही. गुढीपाडवा मेळाव्यात ते मनसेची नवी राजकीय दिशा स्पष्ट करतील. आगामी निवडणुका मनसे स्वबळावर लढणार की, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची गुढी उभारणार, याची घोषणा या सभेत होण्याची शक्यता आहे.