परप्रांतीयांबद्दल राज ठाकरे यांची भूमिक काय? भाजपाला पाठवली भाषणाची लिंक

भाजप आणि मनसे युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे

Updated: Jul 26, 2021, 04:31 PM IST
परप्रांतीयांबद्दल राज ठाकरे यांची भूमिक काय? भाजपाला पाठवली भाषणाची लिंक title=

मुंबई : नाशिक महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजप युतीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 'मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राला हवं असलेलं नेतृत्व आहे. परंतु ते एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाही. मनसेने परप्रांतियांबाबतची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत युती करणं अशक्य आहे', असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. 

मनसे प्रमुख राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर असताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सोबत राज ठाकरे यांची भेट झाली होती. काही वेळ झालेल्या या भेटीत राज ठाकरे यांनी आपली परप्रांतीयांबद्दल भूमिका काय आहे हे समजण्यासाठी एका कार्यक्रमाची लिंक यू ट्यूब लिंक पाठवतो असं सांगितलं होतं. त्यानुसार राज ठाकरे यांच्याकडून ही लिंक पाठवण्यात आली आहे. उत्तर भारतीय मंच द्वारा आयोजित कार्यक्रमात राज यांनी हिंदीतून परप्रांतीयांबद्दल असलेल्या भूमिके बद्दल केलेल्या भाषणाची ही लिंक आहे.

फडणवीस यांनी केला खुलासा

दरम्यान, भाजप आणि मनसेची युती होणार नाही. दोन्ही पक्षांच्या विचारसरणीत फरक आहे, असं वक्तव्य विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस यांनी केलं आहे. मनसेसोबत युती करण्याबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि मनसेच्या विचारांत तफावत आहे. भाजपला भाषेच्या आधारावर भेद मान्य नाही असं फडवणीस यांनी म्हटलं आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची याबद्दलची भूमिका स्पष्ट केल्याचंही त्यांनी सांगीतलं. 

दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी भाजप- मनसे युतीवर मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मी त्यांना भेटणार आहे, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगतिलं. मुनगंटीवार यांच्या या विधानाने भाजप-मनसे युतीच्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.