मुंबई: राज्यभरात वेगाने फैलावत असलेल्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खासगी ट्रॅव्हल कंपन्यांवर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार आता ट्रॅव्हल कंपन्यांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय किंवा देशांतर्गत सहली आयोजित करता येणार नाहीत. या नियमाचे पालन न केल्यास संबंधित कंपन्यांवर कलम १४४ मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध कायम राहणार आहेत. कोरोना व्हायरस फैलाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. कोणालाही अपवादात्मक परिस्थितीत प्रवास करण्याची गरज भासल्यास मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल सर्व शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, नाट्यगृहे आणि मॉल्स बंद ठेवण्याचा आदेश सरकारकडून देण्यात आला होता. मात्र, काही मल्टिप्लेक्स चालकांनी लेखी आदेश आला नसल्याचे सांगत चित्रपटगृहे सुरुच ठेवली होती. त्यामुळे सरकारी आदेशाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
To prevent spread of #COVIDー19, Mumbai Police has issued order prohibiting any tour involving group of people travelling together to a foreign/domestic destination organised by pvt tour operators or otherwise using powers u/s 144 CrPC. Order shall remain in force till 31st March pic.twitter.com/1FeO5ZwIHG
— ANI (@ANI) March 15, 2020
दिल्लीच्या कपूर कुटुंबीयांची कोरोनावर मात; रुग्णालयातून सुखरूप घरी
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील नागरिकांना गर्दी न करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई, ठाणे, डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या होत्या.
देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १०७; भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमा बंद
महाराष्ट्रात आतापर्यंत ३२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी औरंगाबादमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. ही महिला नुकतीच कझाकिस्तानमधून परतली होती. राज्यातील ९ शहरांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेत. यामध्ये सर्वात जास्त १५ रुग्ण पुण्यात आहेत. त्याखालोखाल मुंबई, नागपूर शहरात कोरोनाचे रुग्ण आढळलेत. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, कामोठेत प्रत्येकी एक रुग्ण आढळलाय. तर यवतमाळमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने राज्य सरकारची आणि आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांचा खर्च राज्य सरकारकडून करण्यात येण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.