मुंबई : भाजपनं शिवसेनेसोबत निवडणूक लढण्याची इच्छा व्य़क्त केली असली तरी भाजपच्या वागण्यानं शिवसैनिक दुखावले गेले आहेत. मात्र भाजपसोबत जायचे की नाही याचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी रोखठोकच्या चर्चेत दिली.
शिवसेनेला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका लढवण्याचं सूतोवाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केलंय. 'झी २४ तास'च्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह यांनी हे संकेत दिलेत... तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही महामेळाव्या बाळासाहेब ठाकरेंची आठवण काढली... आणि चंद्रकांत पाटलांनीही शिवसेना बिथरणार नाही, अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिला. महामेळाव्यात भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं. त्यामुळं भाजपचा हा शिवसेनेला गोंजारण्याचा प्रयत्न करतंय का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. २०१९ च्या विजयासाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर हल्ला चढवतानाच आरक्षण हटवणार नाही आणि कुणाला हटवू देणार नाही, अशी ग्वाही अमित शाहांनी यावेळी दिली. तर सिंहाशी लांडगे लढू शकत नाहीत, अशा इशारा देत मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल चढवला.... तर नितीन गडकरींनी या मेळाव्यात नाव न घेता राज ठाकरेंना आव्हान दिलं.