राज ठाकरेंचा शंभर नंबरी सवाल

शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

Updated: Nov 22, 2011, 05:37 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

शरद पवारांचे सासरे अजित पवारांचे आजोबा कसे काय होऊ शकतात अशी खास राज ठाकरे शैलीतली टिका राज ठाकरेंनी केली. शरद पवारांचे सासरे रणजी क्रिकेटपटू होते आणि ते आपले आजोबा होते असं विधान अजित पवारांनी केलं होतं.

 

अजित पवारांनी मागच्या आठवड्यात लातूरात उध्दव आणि राज ठाकरेंवर हल्ला चढवला होता त्याला सडेतोड प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिलं. दारा सिंगही उद्या त्यांचे आजोबा असतील कारण शरद पवार कुस्तीगीर संघटनेचेही अध्यक्ष आहेत  असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. अजित पवारांनी आपल्या काकांच्या कृपेने मिळालेली आमदारकी आणि मंत्रिपद सांभाळावं अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली.

 

आनंद परांजपेंना मनसेत प्रवेश करायचा होता आणि ते संपर्कात होते याबद्दल राज ठाकरेंना विचारलं असता माझ्या घराबाहेर 24 तास पोलिस असतात त्यांची साक्ष काढता येईल. राज ठाकरेंनी एकप्रकारे मनसेचे आमदार राम कदम यांची पाठराखण केली आहे.

महापालिका निवडणुकींच्या उमेदवारीसाठी लेखी परिक्षा घेण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकल्पनेचं सर्वांनी स्वागतच केल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ही लेखी परिक्षा कुणाचे पत्ते कापण्यासाठी घेण्यात येत नाही तर महापालिकेचा कामकाजासंदर्भात आवश्यक ती माहिती आणि ज्ञान उमेदावाराकडे आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी आहे. तसंच उमेदवाराचा बुध्द्यांक तपासण्यासाठी ही परिक्षा घेण्यात येणार आहे. उमेदवारांसाठीची लेखी परिक्षा सोपी असून त्यात ऑपशनल प्रश्नांचाचा समावेश आहे. उमेदवारांची मुलाखत आपण स्वत: घेणार आहोत. तसंच उमेदवारीसाठी जनसंपर्क आणि पैशाचे पाठबळ हे दोन्हीही आवश्यक असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. महापालिकांचे अर्थसंकल्प 20,000 कोटी रकमेचे असतात जर नगरसेवकाला महापालिका कळली नाही तर प्रॉब्लेमच आहे असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.

उत्तर प्रदेशचे विभाजन चार राज्यात करण्यात येण्याविषयी प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की पूर्वी एका दिशेने यायचे आता चारही बाजूंनी येतील.

शिवसेनेवरही राज ठाकरेंनी यांनी निशाणा साधला. शिवसेनेच्या स्थापनेनंतर झालेल्या आंदोलनात अनेक कार्यकर्त्यांवर पोलिस केसेस दाखल झाल्या पण महापौर हेमचंद्र गुप्ते झाले तसंच शिवसेनेसाठी अनेकांनी तुरुंगवास भोगला, पोलिसांचा मार खाल्ला पण मुख्यमंत्री मनोहर जोशी झाले. सर्वांनाच उमेदवारी देणं शक्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.