www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेमुळेच काही काळ भाजपमध्ये आणि शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता याची कबुली दिलीय. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा अंतिम भाग आज `सामना` या शिवसेनेच्या मुखपत्रातून प्रकाशित झाला. या मुलाखतीच्या अखेरच्या भागात जनतेच्या मनातील ‘मनसे’पासून ‘हिंदुत्वा’पर्यंतच्या अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
‘मनसे’ कोणत्याही परिस्थितीत महायुतीत सामील होऊ शकत नाही. मोदी आणि राजनाथसिंह यांनी तसं स्पष्ट केलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘मतफुटी’ची भीती बाळगू नका. जनता स्थिर आणि मजबूत सरकारसाठी मतदान करील आणि ‘मतफुटी’वाल्यांना उडवून लावेल, असंही त्यांनी ठणकावलं.
भारतीय जनता पक्षाशी कधी नव्हे ते सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाल्याचं सांगतानाच मधल्या काळातील तणाव हा एका व्यक्तीमुळं निर्माण झाल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी मारला. ‘आप’चा झाडू महाराष्ट्रात अजिबात चालणार नाही. शिवसेना हाच इथं आम जनतेचा आवाज आहे. केजरीवाल हे पळपुटे आहेत. त्यांना महाराष्ट्रात थारा नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.