नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

Updated: Aug 20, 2014, 10:05 PM IST
नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल  title=

नवी दिल्ली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

पुणे मेट्रोला मागे टाकत नागपूरची मेट्रो सुसाट सुटणार अशी चिन्हं आहेत. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रोचं भूमिपूजन होतंय. मेट्रोच्या या रेसमध्ये पुणं मात्र मागे पडलंय. पुण्याच्या मेट्रोला धावण्याआधीच ब्रेक. पुण्याची मेट्रो राजकारणात अडकली आहे.

पुणे. आयटीहब असलेलं राज्यातलं झपाटयानं वाढत असलेलं शहर..वाहतूक कोंडी ही इथली एक मोठी समस्या. पुणेकर पाहताहेत गेली अनेक वर्षं मेट्रो रेल्वेचं स्वप्न. पण पुणेकरांचं हे स्वप्न मात्र प्रत्यक्षात येण्याची चिन्ह नाहीत. पुण्याची ही मेट्रो राजकीय वादात अडकलीय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यातील आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडताहेत.

एकंदरीत काय पुण्याची मेट्रो रखडली आहे. काय आहेत पुण्याची मेट्रो रखडण्याची कारणं? मेट्रोला मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्यासाठी मुळात काही अटींची पूर्तता करायला हवी. मेट्रोला मंजुरी मिळण्यासाठी, मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करणं, मेट्रो बाधित झोनवरच्या हरकती, सूचनांची सुनावणी घेणं, मेट्रो प्रकल्पासाठी स्वतंत्र अधिकारी नेमणं, मेट्रो प्रकल्पासाठी निधीची तरतूद करणं 
यांसह १० अटींची पूर्तता महापालिका आणि राज्य सरकारनं करणं आवश्यक आहे. 

त्या पूर्ण केल्या तरंच पुण्यातल्या मेट्रोला केंद्राची अंतिम मान्यता मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणं अपेक्षित आहे. पण राज्यातील आघाडी सरकार पुणे मेट्रोच्या कामात आघाडी घेण्यात कमी पडलयं. त्यामुळं मंजुरी रखडलीय. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीची मेट्रो रखडली असतांना राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरनं मात्र बाजी मारलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूरात मेट्रोचे भूमिपूजन होतयं. नागपूरचे खासदार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आलयं. सर्व गोष्टींची वेळेत पुर्तता होऊन आता नागपूरकराचं मेट्रोचं स्वप्न साकारतयं. 

पुणे तिथे काय उणे असं एकेकाळी मानलं जात असे. पण आता पुण्याला मागे सारत इतर शहरं बाजी मारताहेत असं चित्र दिसतयं. नागपूर मेट्रोबद्दल आनंद व्यक्त करायचा की पुण्याची मेट्रो रखडली याचं दु:ख व्यक्त कराययं याचा निर्णय आता राज्यातील आघाडी सरकारनचं करायचा आहे. पुण्यातली मेट्रो एवढी वर्ष रखडली याची जबाबदारी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण घेणार का हाच खरा सवाल आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.