www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
तुरुंगातून बाहेर पडताच लालूप्रसाद यादव यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं म्हटलंय. तसंच, त्यांनी भारतीय जनता पक्षासारख्या जातीयवादी पक्षाविरुद्ध लढण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगितलं.
जेलबाहेर आल्यानंतर लालूंनी आपल्या `खास अंदाजात` प्रतिक्रिया दिली. "जो आदमी जेल से डरेगा वो कुछ नहीं कर सकता, जेल हमारे कृष्ण भगवान की जन्म भूमी है" असं लालू म्हणाले. इतकंच नाही तर आपण देशभरात निवडणूक प्रचार करणार असून, नरेंद्र मोदींशीही लढण्यास तयार आहे, असंही लालूंनी सांगितलं.
लालूप्रसाद यादव यांच्या सुटके संदर्भातील कागदपत्रं कनिष्ठ कोर्टात पोचली नसल्यानं लालूंना आजपर्यंत तुरुंगातच राहावं लागलं. सुटकेनंतर घरी जाण्यापूर्वी लालूप्रसाद यादव देवदर्शनासाठी गेल्याचं राष्ट्रीय जनता दलाचे झारखंडमधील प्रवक्ते मनोज कुमार यांनी सांगितलं.
दरम्यान, पशुखाद्य गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं ३० सप्टेंबर रोजी लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावलीय. या विरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. याच घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्र यांच्यासह आणखी ४४ जणांना शिक्षा झाली आहे.
रांची इथल्या सीबीआयच्या विशेष कोर्टानं लालू आणि अन्य आरोपींना चारा घोटाळ्यात दोषी ठरवलं. या निर्णयाविरोधात लालूंनी सुप्रीम कोर्टाकडं दाद मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टानंही शिक्षा कायम ठेवल्यामुळं लालूंची जेलमध्ये रवानगी झाली होती. दोषी आढळल्यामुळं लालूंची खासदारकी आधीच रद्द झाली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.