www.24taas.com, वृत्तसंस्था, बंगळुरू
अजरामर संगीताने आणि जादुई आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला अनमोल योगदान देणारे मन्ना डे यांचे बंगळुरू येथील खासगी रूग्णालयात निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
मन्ना डे यांना छातीत जंतूसंसर्ग झाल्यामुळे बंगळूरमधील एका खासगी रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर निवासस्थानीच उपचार सुरु होते. पण, शनिवारी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मन्ना डे यांचे मुळ नाव प्रबोधचंद्र डे. रवींद्र संगीताची जन्मभूमी असलेल्या कोलकात्यात एक मे १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला. सुमधूर रवींद्र संगीताचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव आहे. ९४ वर्षे वयाच्या मन्ना डे यांनी हिंदीसह बंगाली, भोजपूरी, मगध, पंजाबी, मराठी, मैथिली, आसामी, उडिया, गुजराती, कोकणी, कन्नड, मल्याळी, अवधी, छत्तीसगढी अशा विविध भाषांमध्ये संगीत आणि पार्श्वधगायन केले.
एका अर्थाने त्यांनी भारतीयत्वच संगीताच्या माध्यमातून उभे केले. केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण देऊनही गौरविले आहे. केंद्र सरकारने २००७चे दादासाहेब फाळके पुरस्काराचे ते मानकरी आहेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मन्ना डे यांच्या उत्तूंग संगीत कारकीर्दीचा गौरव आला.
देवदास, आवारा, सीमा, बरसात की रात, झनक झनक पायल बाजे, दो बिघा जमीन, देख कबिरा रोया, श्री ४२०, चोरी चोरी, मदर इंडिया, मधुमती अशा पन्नास आणि साठच्या दशकातील गाजलेल्या चित्रपटांना मन्ना डे यांचा स्वर लाभला. १९४३ पासूनची त्यांची कारकीर्द अगदी २०१३ पर्यंत सुरू राहिली.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.