मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना संपेल, असे चित्र उभे केले गेले. मात्र अशाही परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मेहनत घेऊन शिवसेना मजबूत केली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशात शिवसेनेचे योगदान मोठे आहे. शिवसेनेच्या मतांमुळेच महायुतीला विजय शक्य झाल्याचे सांगत पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले.
या आधीही राज-उद्धव यांना एकत्र येण्याचं आव्हान केलं होतं - पवार
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती तुटल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याचे संकेत आहेत. याबाबत पवार यांना विचारले असता, याअगोदरही मी या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.
दोन्ही भाऊ एकत्र येऊन बंधुत्व सांभाळणार असतील तर आम्हाला आनंद आहे. दोघे एकत्र आल्यास इतरांचाही त्रास कमी होईल, अशी कोपरखळी पवार यांनी मारली.
लोकसभा निवडणुकीत भाजपच्या यशामध्ये शिवसेनेचेही योगदान मोठे आहे. आजपर्यंत भाजपला ज्या ज्या वेळी सत्तेत जाण्याची संधी मिळाली, त्या त्या वेळी शिवसेनेचा आधार त्यांना होता, असे पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.